डॉक्टरांचे आंदोलन तीव्र, आरोग्य सेवा कोलमडली; देशभरातून आंदोलनाला पाठिंबा, रुग्णांचे हाल

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध करण्यात येत असून डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच शासकीय रुग्णालयांत आज सलग पाचव्या दिवशी जोरदार आंदोलन करण्यात आले. काही रुग्णालयांमध्ये केवळ इमर्जन्सी सेवा सुरू होत्या, तर काही ठिकाणी ओपीडीदेखील बंद असल्याने रुग्णांचे हाल झाले.

कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटत आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करीत ‘मार्ड’ संघटनेने मंगळवारपासून संप पुकारला असून न्यायाची मागणी करण्यात येत आहे. मात्र संपामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. डॉक्टरांकडून केवळ इमर्जन्सी सेवाच देण्यात येत असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱयातून पालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱया रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. शस्त्रक्रिया ठप्प झाल्या असून संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून पुढची निश्चित तारीख मिळत नसल्याने गोरगरीब रुग्णांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शिवाय अनेक रुग्णालयामंध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पालिकेची आरोग्य सेवा कोलमडल्यामुळे उपनगरीय रुग्णालये, आरोग्य पेंद्रे, दवाखान्यांतील डॉक्टर हे प्रमुख रुग्णालयांमध्ये तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार केईएममध्ये 43, शीव रुग्णालयात 41, कूपर रुग्णालयात 45 तसेच नायर रुग्णालयात 45 डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्यात आली. त्यांच्याकडून काही प्रमाणात ओपीडी आणि रुग्णालय व्यवस्थापनाची कामे करण्यात आली.

मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन

मार्ड आणि आयएमए या संघटनांच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. त्याला आपला पाठिंबा असल्याचे पालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने म्हटले आहे. निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी आम्ही बाह्य रुग्ण सेवेतही सहभागी झालो नाही. डॉक्टरांच्या मागण्यांवर सोमवारपर्यंत योग्य तो तोडगा काढावा. नाहीतर मंगळवारी सामूहिक नैमित्तिक रजा आंदोलन करावे लागेल, असे या संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.

ठाणे,  रायगडमध्ये चार लाख डॉक्टर संपावर

कोलकाता येथील घटनेचा निषेध करत ठाणे, रायगड, पालघरमधील 4 लाख डॉक्टरांनी 24 तास संपाची हाक दिली. या आंदोलनादरम्यान आज ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी व उरणमधील डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. या आंदोलनादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन व मार्ड संघटनेतील डॉक्टर, इंटर्न व वैद्यकीय शिक्षकांसह नॉन अॅलोपथिक डॉक्टर, शासकीय तसेच खासगी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, आयुर्वेदिक, होमिओपथिक, केमिस्ट अशा विविध संघटनेतील डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी व महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पेंद्र सरकारने ‘व्हायलन्स अगेन्स्ट हेल्थकेअर अॅण्ड डॉक्टर’ कायदा लागू करावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशने केली. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही इंडियन मेडिकल असोसिएशनचे संतोष कदम यांनी दिला आहे.