नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात, कोल्हापूरवरील पुराचे संकट तूर्त टळले; अजूनही 22 बंधारे पाण्याखाली

गेल्या आठवड्यापासून जिह्यात सर्वत्र दमदार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तूर्त पुराचे संकट टळले असून, नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. अजूनही 22 बंधारे पाण्याखाली असून, पंचगंगेच्या पाणीपातळीत 10 फुटांनी घट झाली आहे.

शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कमी असला, तरी धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक दिसून येत आहे. त्यामुळे राधानगरीसह वारणा, कुंभी आदी मोठ्या धरणांत संथ गतीने पाणी जमा होत आहे. सध्या छोटे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, मोठे धरण प्रकल्प 45 टक्क्यांहून अधिक भरले आहेत. 8.36 टक्के टीएमसी क्षमतेच्या राधानगरी धरणात सध्या 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी सातच्या अहवालानुसार, राधानगरी धरणातून 1300 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तुळशी 1.77, वारणा 17.32, दूधगंगा 8.85, कासारी 1.26, कडवी 1.72, कुंभी 1.14, पाटगाव 2.38, चिकोत्रा 0.52, चित्री 1.11, जंगमहट्टी 1.00, घटप्रभा 1.56, जांबरे 0.82, आंबेओहोळ 1.01, सर्फनाला 0.28 आणि कोदे लघुप्रकल्पात 0.21 टीएमसी पाणीसाठा आहे.