राष्ट्रीय पारितोषिकांत कोल्हापूर, सांगली, सातारचा झेंडा

ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊसगाळप, सर्वोत्तम साखरउतारा, सर्वांत जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूरचा ‘शाहू’ आणि ‘जवाहर’, सांगलीतील ‘लाड’ आणि ‘सोनहिरा’, तसेच कराडमधील ‘सह्याद्री’ साखर कारखान्यांचा झेंडा फडकला आहे.

देशातील 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ’ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करून पुरस्कारांची घोषणा केली जाते. ऑगस्टमध्ये दिल्ली येथे बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.

केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे सन 2022-23साठीची एकूण 21 पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी जाहीर केली. याप्रसंगी महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. यंदा (2022-23) गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून 92 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यांत महाराष्ट्र (38), उत्तर प्रदेश (11), गुजरात (11), तामीळनाडू (10), पंजाब (8), हरियाणा (8), कर्नाटक (4) आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड (प्रत्येकी एक) कारखाने सहभागी झाले होते. पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखरउतारा (किमान सरासरी 10 टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण 53 सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. सरासरी 10 टक्क्यांपेक्षा कमी साखरउतारा असणाऱ्या दुसऱ्या गटात उत्तर प्रदेश, पंजाब, तामीळनाडू, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड राज्यांतील 39 कारखान्यांचा समावेश होता.

महाराष्ट्राला सर्वाधिक 10 पारितोषिके

एकूण 21 पारितोषिकांत महाराष्ट्राने 10 पारितोषिके पटकावून अव्वल स्थान पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशला चार पारितोषिके प्राप्त झाली. गुजरात, तामीळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली, तर पंजाब, हरयाणा व मध्य प्रदेशला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले. यंदा संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे ‘वसंतदादा पाटील पारितोषिक’ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. (दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यास मिळाले.

पुरस्कारप्राप्त कारखाने

उत्कृष्ट ऊस उत्पादकता ः उच्च उतारा विभाग

प्रथम ः क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड कारखाना, पलूस, जि. सांगली.

द्वितीय ः लोकनेते सुंदररावजी सोळुंके कारखाना, माजलगाव, जि. बीड.

तांत्रिक कार्यक्षमता ः उच्च उतारा विभाग

प्रथम ः श्री पांडुरंग कारखाना, माळशिरस, जि. सोलापूर.

द्वितीय ः श्री विघ्नहर सहकारी कारखाना जुन्नर, जि. पुणे.

विक्रमी ऊसगाळप ः उच्च उतारा विभाग

विठ्ठलराव शिंदे कारखाना, माढा, जि. सोलापूर.

विक्रमी ऊसउतारा ः उच्च उतारा विभाग

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना,
कडेगाव, जि. सांगली.

उत्कृष्ट साखर कारखाना ः उच्च उतारा विभाग

श्री छत्रपती शाहू कारखाना, कागल, जि. कोल्हापूर.

विक्रमी साखर निर्यात – प्रथम ः जवाहर शेतकरी कारखाना, हातकणंगले, जि. कोल्हापूर.

द्वितीय ः सह्याद्री कारखाना, ता. कराड, जि. सातारा.