कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील काही वंदेभारत एक्स्प्रेसचा आज एकाचवेळी ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावरील वंदेभारत एक्स्प्रेसचाही शुभारंभ झाला. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी ही एक्स्प्रेस पुण्याकडे रवाना झाली. या बहुचर्चित एक्स्प्रेसचे करवीरवासीयांकडून ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी कोल्हापूर-पुणे वंदेभारतचे दर कमी करण्यासह कोल्हापूर-मिरज दुहेरीकरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, मध्य रेल्वेचे विशेष प्रबंधकांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-मुंबई वंदे भारतसाठी पाठपुरावा सुरू

n आज शुभारंभ झालेल्या कोल्हापूर-पुणे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसपेक्षा कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या मार्गावर वंदेभारत सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. तत्पूर्वी कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस आज सुरू झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील वंदेभारत एक्स्प्रेसचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस धावेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.