कोल्हापुरात मिरवणुकीतील डीजे, लेझर शोवर ‘वॉच’, यंदाही पंचगंगेत विसर्जन नाही

घरगुती श्रीगणेश विसर्जनानंतर आता छोटय़ा-मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव तालीम, मंडळांच्या श्रीगणेश मूर्तींचेही उद्या (दि. 17) अनंत चतुर्दशीला भव्य मिरवणुकीने विसर्जन होत आहे. पारंपरिक विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यांचे पॅचवर्क, टॉवरची उभारणी पूर्ण झाली आहे. यंदाही प्रशासनाने पंचगंगा नदीऐवजी रंकाळा तलावालगत इराणी खणीत विसर्जनाची तयारी केली आहे.

गेल्या वर्षी आणि यंदा गणेश आगमनावेळी आलेला अनुभव पाहाता, यंदा जिल्हा प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीत लेझर किरणांना बंदी घातली आहे. शिवाय आवाज मर्यादा ओलांडणाऱया मंडळांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांचा विसर्जन मिरवणुकीवर ‘वॉच’ राहणार आहे.

मिरवणुकीची जय्यत तयारी

मिरवणुकीत सहभागी सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्थांच्या अध्यक्षांना महापालिकेसह विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या वतीने पापाची तिकटी ते गंगावेश परिसरातील स्वागत मंडपात स्वागत करण्यात येणार आहे. मिरवणुकीतील सहभागासाठी आरास व ट्रक्टर ट्रॉली सजविण्यासह देखाव्याची अंतिम तयारी जोरात सुरू होती. यंदा मंडळांना विसर्जन मिरवणुकीत लेझर किरणांना बंदी आहे. शिवाय आवाजाची मर्यादा ओलांडणाऱया मंडळांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सातपर्यंत मिरवणूकमार्गात सहभागी होणाऱया मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर भर दिला आहे. तर, रात्री साउंड सिस्टिमसह लाईट-शोचा झगमगाट पाहायला मिळणार आहे.

बारा वाजता आवाज बंद म्हणजे बंद

विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल काबू पथक आणि होमगार्ड अशी सर्व दले सज्ज झाली आहेत. विसर्जन मार्गासह क्रशर खण आणि शहरातील प्रमुख मार्गांवर 2 हजार 189 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतील. लेझर किरणांचा मारा तसेच आवाजाची मर्यादा ओलांडणाऱया मंडळांवर पोलीस यंत्रणा वॉच ठेवणार आहे. या मंडळांवर मोठय़ा प्रमाणात गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही बारा वाजता साउंड सिस्टिमचा आवाज बंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा ‘ऍक्शन मोड’वर आहे.

नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मार्ग

पर्यायी मार्गासह मुख्य बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार ते गंगावेश या मार्गांवर सायंकाळी सहा ते रात्री बारा प्रचंड गर्दी असल्याने, जाणाऱया आणि येणाऱया नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मार्ग केले जाणार आहेत. विसर्जन मार्गापासून 100 मीटर अंतरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पोलीस बंदोबस्त

मिरवणूक मार्गावर एकूण 2 हजार 100 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांसह एक अपर पोलीस अधीक्षक, 7 उपअधीक्षक, 26 पोलीस निरीक्षक, 103 सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, 634 पुरुष व 129 महिला अंमलदार, 270 जवान स्ट्रायकिंग फोर्स, रॅपिड ऍक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दल तसेच 523 पुरुष आणि 46 महिला होमगार्ड यांचा समावेश आहे.

मनपाची तयारी पूर्ण

विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागांचे 2 हजार 500 कर्मचारी, विभागीय कार्यालयांतर्गत गणेशमूर्ती आणण्यासाठी 70 टेम्पो 320 हमाल, पाच जेसीबी, सात डंपर, चार ट्रक्टर, चार पाण्याचे टँकर, दोन बुम, सहा ऍम्ब्युलन्स व आठ फ्लोटिंगचे तराफे अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील पॅचवर्क करण्याचे काम सोमवारी रात्रीपर्यंत सुरू होते.