कोल्हापुरात दुसऱया दिवशीही गडगडाटासह तुफान पाऊस, श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची तारांबळ

शारदीय नवरात्रोत्सवात जिह्यात सर्वत्र मांगल्य आणि चैतन्याचा वर्षाव सुरू असताना, बुधवारपासून ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. गुरुवारी (दि. 10) सलग दुसऱया दिवशीही ढगांच्या गडगडाटात आलेल्या पावसाने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची तारांबळ उडाली. दररोज लाखोंच्या संख्येने होत असलेल्या गर्दीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

दररोज लाखोंच्या संख्येने भाविक

z गुरुवार, दि. 3 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 1 लाख 34 हजार 466 भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. दुसऱया दिवशी 1 लाख 67 हजार 238, तिसऱया दिवशी 1 लाख 68 हजार 274, चौथ्या दिवशी रविवारी सुट्टीमुळे तब्बल 2 लाख 74 हजार 347 भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पाचव्या दिवशी 1 लाख 37 हजार 827, सहाव्या दिवशी 1 लाख 76 हजार 356 आणि बुधवारी सातव्या दिवशी 79 हजार 263 भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्री जोतिबा डोंगरावर यंदा अष्टमीला जागर; मंदिर रात्रभर खुले

z जोतिबाचा जागर सोहळा गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी झाला. या दिवशी श्री जोतिबास तेल वाहणे, कडाकणी, ऊस व गुलाल दवणा, श्रीफळ अर्पण करून फराळाचे नैवेद्य दाखविण्याची, विविध धार्मिक सोहळे व मंत्रपठणाबरोबरच विविध मानपानांची प्रथा आहे. दरवर्षी परंपरेनुसार जोतिबाचा जागर सप्तमीला असतो. यंदा आठव्या दिवशी जागर सोहळा आला आहे. या दिवशी अश्व अर्पण करून ‘श्रीं’ची कमळ पुष्पातील बैठी महापूजा बांधली जाते. यावेळी नारळ, सीताफळ, खोबरे वाटी, कवडाळांचे तोरण बांधण्याचा विधी झाला. जोतिबाच्या जागराचे वैशिष्टय़ म्हणजे जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर कोणत्याही देवाचा जागर होत नाही. या दिवशी मंदिर रात्रभर खुले राहते.