दुधासह हिरड्याला रास्त भाव द्या; अकोले तहसीलवर किसान सभेचा मोर्चा

दूध व हिरड्याला रास्त भाव द्या, या मागणीसाठी अकोले तहसील कार्यालयावर ‘किसान सभे’च्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूधदर वाढविण्याबाबत सरकार करीत असलेल्या दिरंगाईचा धिक्कार करण्यात आला.

गेले अनेक दिवस नगर जिल्ह्यातील शेतकरी दुधाला आणि हिरड्याला सरकारने योग्य भाव द्यावा, अशी मागणी करीत आहेत; परंतु सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे शेतकरीवर्ग प्रचंड संतप्त झाला आहे. डॉ. अजित नवले यांच्या सहा दिवसांच्या उपोषणानंतरही दूधदरवाढीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यामुळे किसान सभेने आज अकोले तहसील कार्यालयाच्या परिसरात दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी किसान सभेचे डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, भीमा मुठे, शिवराम लहामटे, तुळशीराम कातोरे आदींसह परिसरातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.