अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील रस्त्यावरील पथदिवे दोन वर्षापासून बंदच असल्याने येथील नागरिकांना व व्यापाऱ्यांना या वर्षीची दिवाळी सुद्धा अंधारातच साजरी करावी लागणार असल्याने नागरिकांत प्रशासना बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
किनगाव येथून राष्ट्रीय महामार्ग 548डी गेला असून तो अहमदपूर – अंबाजोगाई तसेच अनेक मोठ्या शहरांना जोडला गेला आहे, या मार्गावर महामार्ग ठेकेदाराकडून दोन वर्षापूर्वी पथ दिवे बसवण्यात आले, परंतु ते महावितरण कंपनी आणि ठेकेदारांच्या आर्थिक वादात अडकल्याने अद्याप बंदच असून बाजारपेठेतील नागरीक व व्यापाऱ्यांची अंधारामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रस्त्यावरील पथदिवे मात्र केवळ रस्त्यावरील शोभेची वास्तू बनल्याचे चित्र दिसत आहे.हिंदू धर्मीयांचा वर्षातील सर्वात मोठा संस्कृती,परंपरा जपणारा उत्सव म्हणुन दिवाळी हा सण खुप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
बाजारपेठेत खुप मोठी अर्थिक उलाढाल होते, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षाने मात्र येथील रस्ते अंधारमय झाल्याने नागरिकांकडून केलेली खरेदी व व्यापाऱ्यांना त्यांच्याकडून दुकानातील वस्तू व रोकड अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांकडून पळविली जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. केवळ महामार्गाच अंधारात नसून येथील सावरकर चौक – बसस्थानक – ग्रामपंचायत ते हनुमान मंदिरापर्यंत चे रस्ते अंधारमय झाल्याने रात्री येथील महिला, तरुणी, नोकरदार, किशोवयीन मुले, मुली , व्यापाऱ्यां मध्ये रस्त्यावर उतरतांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने त्यावर चालताना नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन किमान या धार्मिक उत्सवानिमित्त तरी किनगावला दिपमय करून नागरिकांची गैरसोय टाळावी. अशी मागणी किनगावकरां कडून केली जात आहे.