भररस्त्यातून सोने व्यापाऱ्याचे अपहरण; मुंबई पोलिसांनी अवघ्या दोन तासातच केली सुटका

जीवे मारण्याच्या उद्देशाने मुंबईतील काळबादेवी परिसरातून एका सोने व्यापाऱ्याचे चौघांनी अपहरण केले. अपहरणानंतर व्यापाऱ्याला मुंबईबाहेर नेऊन जीवे मारण्याचा आरोपींचा हेतू होता. मात्र मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींचा डाव उधळून लावला. अवघ्या दोन तासात पोलिसांनी व्यापाऱ्याची सुखरुप सुटका केली. शनिवारी सायंकाळी काळबादेवी परिसरातील आदर्श हॉटेल आणि काकड मार्केट दरम्यान ही घटना घडली. एलटी मार्ग पोलीस ठाणे आणि शिवाजी पार्क पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत व्यापाऱ्याची सुटका केली.

पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मंदार बाबू शेट्टी, केशव गणेश महाडिक, अफजल अख्तर सय्यद आणि मोहम्मद मुख्तार दादा हजरत शेख अशी आरोपींची नावे आहेत.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, काळबादेवी परिसरातून एका व्यक्तीचे ब्रेझा कारमधून अपहरण झाल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. गुन्हे शाखेलाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची माहिती काढली.

गाडीच्या नंबरप्लेटवरून मालकाची माहिती पोलिसांनी मिळवली. सदर गाडी इस्कॉन मंदिरातील एका सेवकाची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मालकाशी संपर्क साधला असता गाडी त्याचा सहकारी संदेश भंडारीकडे असल्याचे त्याने सांगितले. मात्र गाडीच्या जीपीआरएस लोकेशन ट्रेस करण्यासाठी गाडी मालकाने पोलिसांना मदत केली.

जीपीआरएस लोकेशनच्या आधारे कार कंबाला टेकडीवर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वीर सावरकर रोडवर सदर कार अडवली. अपहृत व्यापारी आणि चारही आरोपींना एलटी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पीडित जयेश गुप्ता यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.