यजमान धाराशीवने सुवर्ण महोत्सवी (50 वी) कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटांतून विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादला. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेले ‘सावित्री पुरस्कार’ तन्वी भोसले हिने व ‘विवेकानंद पुरस्कार’ सोत्या वळवी या धाराशीवच्याच खेळाडूंनी पटकाविले. मुलींच्या गटात सोलापूर व ठाणे, तर मुलांच्या गटात सोलापूर व पुण्याने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान संपादले. धाराशीवने कुमार गटात पहिलेच विजेतेपद पटकावले असून, मुलींच्या गटात विजेतेपदाच्या चौकारासह (2021-22 पासून सलग चौथे विजेतेपद), तर एकूण आठवे विजेतेपद मिळवत सुवर्ण महोत्सवी वर्षात दुहेरी विजेतेपदासह दिवाळी धमाका साजरा केला.
यापूर्वी 2015-16 साली जळगाव येथे झालेल्या 43 व्या स्पर्धेत ठाण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता. त्यानंतर तब्बल सहा अजिंक्यपद स्पर्धांनंतर धाराशीवला हा इतिहास घडवता आला. यजमान म्हणूनसुद्धा दुहेरी मुकुट मिळवणारा धाराशीव हा पहिला संघ ठरला व प्रेक्षकांनी दिवाळीत विजयोत्सव साजरा करताना आकाश आतिषबाजीच्या विविध रंगांनी भरून टाकले. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशीवने सांगलीचा 11-9 असा 2 गुणांनी पराभव केला. मध्यंतराची 6-4 ही 2 गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. धाराशीवकडून अश्विनी शिंदेने 4.00 व 2.10 मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात 6 गुण मिळवत प्रेक्षकांना दिवाळीत फटाके फोडण्याचा आनंद द्विगुणीत करून दिला. तन्वी भोसलेने 1.20 आणि 2.10 मिनिटे संरक्षण केले. सृष्टी सुतारने 1.10 आणि 1.00 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात 1 गुण वसूल केला. प्रांजली काळेने पहिल्या डावात नाबाद 1.20 व दुसऱ्या डावात 1.30 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात 1 गुण संघाला मिळवून दिला. मैथिली पवारने 1.10 व 1.40 मिनिटे संरक्षण केले. सुहानी धोत्रेने आक्रमणात 3 खेळाडू बाद करताना विजेतेपदाचा धमाका उडवून दिला. पराभूत सांगलीकडून सानिका चाफेने अष्टपैलू कामगिरी करताना 3.10 व 1.40 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात 3 गुण मिळवत ‘हम भी किसीसे कम नही’ या आविर्भावात कामगिरी नोंदवली. सानिया सुतारने 1.40 व 1.30 मिनिटे संरक्षण केले. प्रतीक्षा बिराजदारने आक्रमणात 3 खेळाडू बाद करून संरक्षणामध्ये 1.10 व 2.40 मिनिटे अशी वेळ नोंदवताना कडवी लढत दिली, पण शेवटी धाराशीवने विजेतेपदाचा विजयी चौकार मारलाच.
मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जादा डावांमध्ये धाराशीवने सांगलीवर 23-22 असा 2.30 मिनिटे राखून 1 गुणाने विजय साजरा करताना पहिलेवहिले विजेतेपद खेचून आणले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला 10-7 अशी तीन गुणांची आघाडी धाराशीवकडे होती. त्यानंतर मात्र सांगली संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशीवला 16-16 असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशीवने 2.30 मिनिटे राखून 7-6 अशी बाजी मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करणाऱ्या धाराशीवच्या सोत्या वळवीने 1.50, 2.40 मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. विलास वळवीने 1.20 आणि 1.50 मिनिटे असे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. हरदया वसावेने दोन मिनिट व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. जितेंद्र वसावेने 1.40 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. नितेश वसावेने 1.10 मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात पाच गडी टिपले व जमलेल्या प्रेक्षकांनी मैदानातच फटाक्यांची आतषबाजी केली.
सर्वोत्कृष्ट खेळाडू
अष्टपैलू ः सोत्या वळवी, तन्वी भोसले (धाराशीव).
संरक्षक ः विलास वळवी (धाराशीव), सानिका चाफे (सांगली). आक्रमक ः अश्विनी शिंदे (धाराशीव), प्रज्ज्वल बनसोडे (सांगली).