खालापूर-खोपोली मार्गावरील ‘खड्डाखड्डी’ लवकरच संपणार; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर, प्रवास होणार सुखकर

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील खालापूर ते खोपोली यादरम्यान तब्बल चार वर्षांपासून असलेली ‘खड्डाखड्डी’ अखेर लवकरच संपणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर आयआरबीने हाती घेतले असून वाहनचालकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येत असून हे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांनी वॉच ठेवला आहे.

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील खालापूर ते खोपोली बोरघाट पायथापर्यंतच्या सहा किलोमीटर चौपदरीकरणाचे काम एसआरडीसीने केले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता ताब्यात घेतला नाही. १८ महिन्यांमध्ये हे काम करणे अपेक्षित होते. पण दिलेल्या मुदतीपेक्षा उशिरा काम झाले. तब्बल चार वर्षे या मार्गावर खड्डेच खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. या खड्ड्यांची दुरुस्ती कुणी करायची यावरून एमएसआरडीसी व आयआरबी कंपनीमध्ये वाद निर्माण झाला.

चार वर्षे खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागल्याने वाहनचालक व नागरिक कमालीचे संतप्त झाले होते. कोणत्याही क्षणी या संतापाचा उद्रेक होईल याची जाणीव झाल्याने अखेर आयआरबीने तातडीने खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवासी व चालकांना मोठा दिलासा मिळाला असून आता तरी खालापूर-खोपोली मार्गाची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.