आईला सुखरुप पोहचल्याचा फोन केला, मग सर्वजण झोपी गेले; काही वेळाने अख्ख्या कुटुंबाचा करुण मृत्यू

नोकरीनिमित्त कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या केरळच्या कुटुंबाचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई-वडील आणि दोन मुलांचा घरात लागलेल्या आगीत करुण अंत झाला. एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शुक्रवारी रात्री ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कुवेतमधील हिंदुस्थानी दूतावासाच्या मदतीने चौघांचे मृतदेह हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मॅथ्यूज वर्गीस मुलाकल (40), लिनी अब्राहम (35) आयरीन (14) आणि इसाक (9) अशी मयतांची नावे आहेत. मुलाकल कुटुंबीय दुर्घटनेच्या काही तास आधीच एक महिन्याच्या सुट्टीवरून केरळहून कुवेतला परतले होते. कुवेतला परतल्यानंतर मॅथ्यूज यांनी आईला फोन करून सुखरुप पोहचल्याचे कळवले. त्यानंतर प्रवासाने थकल्यामुळे रात्री 9 वाजता सर्वजण झोपी गेले.

काही वेळाने घरात आग लागली. शेजाऱ्यांनी फायर अँड रेस्क्यू युनिटला अलर्ट केले. मात्र कुटुंबाला वाचवण्यास अपयश आले. अखेर चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मॅथ्यूज हे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियंता होते आणि ते 16 वर्षांपासून कुवेतमध्ये होते. लिनी आरोग्य मंत्रालयाच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती.