केनिया, इथियोपियाचेच वर्चस्व; पुरुषांत केमेई किप्रोनो, तर महिलांत रोबा हैलूची बाजी

भल्यापहाटेचे (साडेतीन वाजता) आल्हाददायक वातावरण… देशभरातील हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह…परदेशी खेळाडूंचीही समाधानकारक संख्या…रहदारी नसल्याने धावपटूंसाठीचा सुटसुटीत मार्ग…अशा एकूणच प्रसन्न व सकारात्मक वातावरणात रंगलेल्या 37 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये केनियाच्या केमेई किप्रोनोने बाजी मारली तर महिलांची पूर्ण मॅरेथॉन इथियोपियाच्या रोबा हैलू हिने जिंकली. हिंदुस्थानची मनीषा जोशी व डिस्केट डोल्मा या हिंदुस्थानी धावपटूंनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये मराठमोळय़ा उत्तम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावित ऐतिहासिक कामगिरी केली, तर महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये निगेटू बोसेझीन हिने जेतेपदाला गवसणी घातली.

देशातील ‘मॅरेथॉनची जननी’ म्हणून ओळखली जाणारी ‘पुणे मॅरेथॉनोत्सव’ हा डिसेंबरच्या पहिल्या रविवारी घेण्याची प्रथा आहे, मात्र कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा दोन वर्षे झाली नव्हती, तर गतवर्षी कोरोनाच्याच संकटामुळे ती डिसेंबरमध्ये न होता फेब्रुवारीमध्ये झाली होती. सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानाच्या बाहेरून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते पहाटे साडेतीन वाजता मुख्य शर्यतीला झेंडा दाखविण्यात आला.

मुख्य शर्यतीला सुरुवात होताच अपेक्षेप्रमाणे केनिया व इथियोपियाच्या सहा धावपटूंच्या जथ्याने पहिल्या झटक्यातच मुसंडी मारली. कल्पना विश्व चौकापासून सारसबाग, वीर सावरकर पुतळा येथून सिंहगड रस्त्यावरून मार्गस्थ झाली. पहिल्या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये या सहा धावपटूंमध्येच पाठशिवणीचा खेळ रंगला होता, मात्र त्यानंतर हळूहळू हा जथ्थ्याही फुटला अन् केमेई किप्रोनो, सिमोन मवांगी व हैलू या धावपटूंनी आगेकूच केली. यात केमेईने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. देशबांधव सिमोन त्याला कडवी लढत देत होता, तर इथियोपियाचा हैलू नंतर थोडा मागे पडला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सकाळी 8.30 वाजता सणस मैदान येथे महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. विजेत्यांना एकूण 35 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

पर्यावरण संवर्धनासाठी पळा!
‘पर्यावरण संवर्धनासाठी पळा’ हे यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे घोषवाक्य होते. या घोषवाक्याच्या पार्श्वभूमीवर थायसन ग्रुपचे विशेष पथक या शर्यतीत पर्यावरण संवर्धन मोहिमेसाठी सहभागी झाले होते. शर्यत मार्गावर पर्यावरणाशी निगडित स्लोगन असलेले फलक घेऊन उभे असलेले तरुण-तरुणी लक्ष वेधून घेत होते.