मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने शनिवार 14 आणि रविवार 15 डिसेंबर रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यात बांधकामांची ठिकाणे आणि बॅरिकेड्समुळे निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यात येणार आहे. तसेच बांधकामांच्या ठिकाणची स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना नोटिसाही बजावण्यात येणार आहेत.
मुंबईला स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाकडून विशेष अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये बांधकामांचा राडारोडा आणि या ठिकाणची अस्वच्छता हटवण्यासाठी काम केले जाणार आहे. मुंबईत विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात राडारोडा साचलेला असतो. शिवाय बॅरिकेड्सवर नागरिकांकडून थुंकण्याचे प्रकारही घडतात. ही दृश्ये मुंबईच्या प्रतिमेला धक्का लावत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.