”देवेंद्र फडणवीस यांना खरोखर संधी आहे. जर त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल, तर चौकशी (रस्ते घोटाळ्याची) पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा. जोपर्यंत सिद्ध होत नाही की, त्यांचे यात हात नाही, कंत्राटदारांचा फायदा झाला नाही, तोपर्यंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की, हे वॉशिंग मशीनचे सरकार नाही”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ”गेल्या दोन वर्षात आम्ही जो रस्ते घोटाळा उघड करत आलो आहोत, 2022 आणि 2023 मध्ये आधी सहा हजार कोटींचा आणि नंतरही सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला होता. यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं, अॅडव्हान्स मोबेलिटी देण्याची आणि तो खर्च सहा हजार कोटीनंतर पाच हजार कोटींवर आला. त्यावेळीही मी सांगत होतो, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यात हात आहे का?”
दीपक केसरकर यांच्या कामकाजावर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ”अजूनही विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश देण्यात आलेले नाही. यातून ते किती कार्यक्षम आहे, मंत्री म्हणून त्यांनी कसं काम केलं, हे सगळ्यांना माहित आहे. ते आणि मंगलप्रभात लोढा यांचा या घोटाळ्यात काही हात आहे का? हे अजूनही कुठे स्पष्ट झालं नसून याचं सरकारकडून उत्तरही आलं नाही.”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ”मागच्या आणि या वर्षी मी हे घोटाळे लोकांसमोर आणले, यानंतर आता रस्त्यांची कामे घाणेरड्याप्रकारे झाल्यानंतर मुंबई भाजप या रस्त्यांच्या कामावर एसआयटी लावा, असं म्हणत आहे. हेच मी गेले दोन वर्ष सांगत होतो की, मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीत रस्त्यांचा घोळ सुरू आहे, त्याची चौकशी करा. आता भाजपला जाग आली आहे. दोन वर्ष झाले मी सांगत आहे की, हिम्मत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा, निवडणूक होऊन गेल्या आहेत. कंत्रादारांना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. मात्र आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून बोलत आहे की, एसआयटी चौकशी लावा. मात्र माझी मागणी ही आहे की, एसआयटीपेक्षा ईब्ल्युओची चौकशी लावा, हवं तर आमच्या आमदारांचे एक पथक बनवा. यात पत्रकार आणि तज्ज्ञांनाही असुद्या. याच रस्ते घोळ्यादरम्यान मी त्यावेळीही सांगत होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनाला आणू नका. पंतप्रधानांचा हा अपमान आहे की, तुम्ही त्यांच्या हाती एका भ्रष्ट कामाचे भूमिपूजन करून घेत आहात. दुर्दैवाने एकनाथ शिंदे यांच्या नादात ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. मात्र हे भूमिपूजन करून घेतल्यानंतर आपण पाहत आहोत की, मुंबईत 2022 – 23 चे रस्ते झाले नाही आणि 2023 – 24 चे रस्तेही झाले नाही. हा घोटाळा तेव्हाही होता, आजही आहे. आज मुंबई भाजप नाटक करत आहे, मग जेव्हा मी बोलत होतो, पुरावेही मी समोर आणले, तेव्हा तुम्ही का, काही बोलला नाही. याचे उत्तर देखील मुंबई भाजपने देणे गरजेचे आहे.”