जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन
देशभरात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून आज उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन झाले. गांधी सरोवराच्या वर बर्फाचा मोठा भाग खाली आला. या दुर्घटनेत जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही.

मृत्यूसमयी मायकल जॅक्सनवर 3700 कोटींचे कर्ज!
‘किंग ऑफ पॉप’ म्हणून विख्यात असलेल्या मायकल जॅक्सनच्या गाण्याने आणि डान्सने चाहत्यांना वेड लावले. जगभरात मायकल जॅक्सनचे करोडो चाहते आहेत. 2009 साली मायकलने वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यू झाला त्या वेळी मायकलवर 3700 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी धक्कादायक बाब समोर आलेय. मायकेल जॅक्सनच्या एक्झिक्युटर्सनी लॉस एंजेलिस काऊंटी सुपीरियर कोर्टात 21 जून रोजी एक फाईल दाखल केली. त्या फाईलमध्ये मृत्यूसमयी मायकेलला भेडसावणाऱया आर्थिक समस्यांचा तपशील आहे. त्यामध्ये मायकेलवर 500 मिलियन डॉलरचे कर्ज होते, असे सांगण्यात आलेय.

इराकच्या मशिदीत सापडले 5 बॉम्ब
इराकच्या उत्तरेकडील अल-नुरी मशिदीत तब्बल 5 मोठे बॉम्ब सापडले आहेत. इसीसी या दहशतवादी संघटनेने मशिदीच्या भिंतीत हे बॉम्ब पुरून ठेवल्याची माहिती अल जजीरा या वृत्तवाहिनीने दिली आहे. एका बॉम्बचे वजन दीड किलोग्रॅम असून एक बॉम्ब भिंतीतून काढण्यात आला तर इतर बॉम्ब हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2017 मध्ये ही मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली.

सिंगापूरच्या धर्मगुरूंना साडेदहा वर्षांची शिक्षा
सिंगापूरच्या धर्मगुरू वू मे हो (54) यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाविकांकडून पैसे वसूल करणे, फसवणूक आणि त्यांच्या भावना दुखावण्यासारख्या 5 आरोपांखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्या एक देवी असल्याचे सांगून भाविकांचा ब्रेन वॉश करायच्या. त्यांच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्या त्यांना क्रूर शिक्षा द्यायच्या.

अहमदाबादेत रस्ताच खचला
मुसळधार पावसाने अहमदाबादची दैना केली असून सर्व परिसर जलमय झाला आहे. आज पाऊस झोडपून काढत असतानाचा अहमदाबादच्या शेला भागातील रस्ता अचानक खचून रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. मुसळधार पावसाने शहराच्या अनेक भागांना तडाखा दिला. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. सोशल मीडियावर जलमय अहमदाबादचे अनेक व्हीडीओही लोकांनी शेअर केले होते. याच पावसामुळे शेला भागात एक रस्ता अचानक खचला. वाहतूक तुरळक असल्यामुळेच या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

पृथ्वीजवळून गेले दोन लघुग्रह
या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनाचा जणू मुहूर्त साधत दोन अशनी तथा उल्का (अॅस्ट्रॉईड) पृथ्वीजवळून पास झाले. जगभरातील अवकाश निरीक्षण संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील कोणताही लघुग्रह पृथ्वीला धोका होईल इतका जवळ आला नव्हता. खगोलभौतिकशास्त्रज्ञ जियानलुका मासी यांनी सांगितले की, 2024 एमके हा सुमारे 200 मीटर व्यासाचा लघुग्रह, पृथ्वीच्या सर्वात जवळ असताना सुमारे तीन लाख किलोमीटर अंतरावर होता. 1908 मध्ये नोंदवलेल्या इतिहासातील सर्वात मोठय़ा उल्कापाताचे स्मरण म्हणून 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन पाळला जातो.

63 वर्षांनंतर सापडली विद्यार्थिनीची पर्स
अनेकदा आपल्या अत्यंत प्रिय वस्तू हरवतात तेव्हा आपण खूप शोधण्याचा प्रयत्न करतो. कधी त्या सापडतात, कधी सापडत नाहीत. मात्र ध्यानीमनी नसताना जेव्हा आपली वस्तू आपल्याला मिळते तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीसं एका विद्यार्थीच्या बाबतीत घडलंय. एका विद्यार्थिनीचे हरवलेले वॉलेट चक्क 63 वर्षांनंतर तिच्या शाळेत सापडलं. या पर्समध्ये कोणत्या वस्तू होत्या हे व्हिडीओमध्ये दाखवल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

1957 मध्ये पॅट्टी रमपह्ला नावाच्या एका विद्यार्थिनीचे लाल रंगाचे वॉलेट हरवले होते. हे पर्ससारखे वॉलेट 63 वर्षांनंतर सापडले.

झोमॅटोला कर्नाटक सरकारचा दणका
ऑनलाईन फूड डिलिवरी प्लॅटफॉर्म ‘झोमॅटो’ला कर्नाटकच्या आयकर विभागाने 9.5 कोटी रुपयांची जीएसटी, व्याज आणि दंडाची नोटीस पाठवली आहे. झोमॅटो पंपनीने स्टॉक एक्सचेंज फाईलिंगमध्ये याची माहिती दिली आहे. 5.01 कोटी जीएसटी, 3.93 कोटी रुपये व्याज, 50 लाख 19 हजार 546 रुपये दंड लावण्यात आलाय. झोमॅटोला ही नोटीस आर्थिक वर्ष 2019-20 साठी मिळाली आहे. कर्नाटक टॅक्स ऑथोरिटीने पाठवलेल्या या नोटीसीविरोधात झोमॅटो पंपनी अपील दाखल करणार आहे. याआधी मार्च महिन्यात झोमॅटो पंपनीकडे कर्नाटक टॅक्स ऑथोरिटीने 23.26 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच दंडाची नोटीस पाठवली होती.