कश्मीरहून आंध्रप्रदेशला जाणारा सफरचंदांचा ट्रक उलटला, नगर-मनमाड महामार्ग ठप्प

कश्मीर येथून आंध्र प्रदेशला सफरचंदांच्या पेटय़ा भरून चाललेला मालट्रक राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस व परिसरातील काही तरुणांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी उशिराने ट्रक बाजूला करण्यात यश आल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, काही लोकांनी सफरचंदांची पळवापळवी केल्याचेही दिसून येत होते.

कश्मीर येथून सफरचंदांच्या पेटय़ा घेऊन हा ट्रक आंध्र प्रदेशला निघाला होता. राहुरी खुर्द शिवारातील मुळा नदीवर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला. ट्रकमधील सफरचंदांचे काही बॉक्स रस्त्यावर विखुरल्याने अनेकांनी या सफरचंदांवर डल्ला मारला. काहीजणांनी चक्क सफरचंदांच्या पेटय़ा पळवून नेल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे वाहतूक पोलीस मनोज राजपुत, अशोक कोळगे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकमधील बचावलेल्या सफरचंदांच्या पेटय़ा तसेच रस्त्याच्या मधोमध उलटलेला ट्रक क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यासाठी मदतकार्य केले. राहुरी खुर्द येथील रफिक शेख, आलम शेख, मयूर खैरे, नवनाथ रूपनर, सोमनाथ गोल्हार, सुरेश बर्डे, संजय कडायत यांच्यासह परिसरातील काही तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

31 डिसेंबर वर्षअखेर असल्याने शिर्डी व शिंगणापूर या जागतिक ख्याती असलेल्या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या वाहनांसह उसाने भरलेल्या ट्रक व परराज्यांतील मालवाहू वाहनांची नगर-मनमाड राज्य महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. ट्रक उलटल्याने काही वाहने राहुरी शहरात घुसल्याने बाजारपेठेतील रस्त्यांवरही मोठी वाहतूककोंडी झाली होती. दुपारी उशिराने अपघातग्रस्त ट्रक हटविण्यात यश आल्याने वाहतूक सुरळीत झाली.