भाजपचं सूडाचं राजकारण; जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री सिद्धारामय्यांची प्रतिक्रिया

siddaramaiah

म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे नमूद करत कर्नाटक हायकोर्टाने मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची याचिका फेटाळली आहे. या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि त्यांची पत्नी आरोपी आहे. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे भाजपचे सूडाचे राजकारण आहे, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरुद्धचा आमचा हा लढा आहे. भाजप आणि जेडीएसच्या या सूडाच्या राजकारणाविरुद्ध आमचा न्यायालयीन संघर्ष सुरूच राहील. माझा न्यायालयावर विश्वास आहे. भाजप आणि जेडीएसने माझ्याविरुद्ध राजकीय सूड उगवला आहे, कारण मी गरीबांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढत आहे, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले.

आपल्या रिट याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला आहे. राज्यपालांनी या प्रकरणी खटला भरवण्यास मंजुरी दिली होती. या निर्णयाला आपण हायकोर्टात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. माध्यमांद्वारे आज याची माहिती मिळाली. अद्याप संपूर्ण निर्णय वाचलेला नाही. यावर नंतर अधिक माहिती देईन, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले.

हा काही खटला नाही. याबाबत मी कायदेतज्ज्ञ आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर मी पुढील निर्णय घेईन. भाजप आणि जेडीएसच्या कारस्थानाला आम्ही घाबरत नाही. आम्ही राज्यपाल कार्यालयालाही घाबरणार नाही. आम्हाला जनतेने आशीर्वाद दिले आहेत. मला त्यांचे आशीर्वाद आहेत. मला पक्ष हायकमांड आणि पक्षश्रेष्ठींचाही पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले.