कर्नाटकची बस बंगळुरू महामार्गावर उलटली, कराडजवळ अपघात; 9 प्रवासी जखमी

कर्नाटक परिवहन महामंडळाची विजापूर-सातारा बस कराड तालुक्यातील शिवडे येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक, वाहकासह नऊजण जखमी झाले. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.

विजापूरहून सातारला निघालेली ही बस दुपारी अडीचच्या सुमारास कराड स्थानकातून मार्गस्थ झाली. भरधाव वेगात निघालेली ही बस तासवडे टोलनाका ओलांडल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांत चालकाचा ताबा सुटल्याने शिवडे गावाजवळ महामार्गामधील दुभाजकावर जाऊन उत्तर मांड नदीवरील पुलाच्या कठडय़ाला धडकून महामार्गावर पलटी झाली. यावेळी मोठा आवाज झाला.

अपघातानंतर शिवडे येथील नागरिकांनी व महामार्गावरून ये-जा करणाऱया प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना बसमधून तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. एसटीमध्ये तीस प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात बसच्या चालक व वाहकासह नऊजण जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस हवालदार आळंदे, नीलेश पवार, भोसले, काळे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

बसचालकाविरुद्ध उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुह्याचा तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक-देशमुख या करीत आहेत.

अपघातातील जखमींची नावे ः ओम विजय शिंदे (रा. वेळेकामटी, ता. जि. सातारा), रूपाबाई अशोक राठोड (रा. वडोली भिकेश्वर, ता. कराड, जि. सातारा), गणेश मोहन वायचळ (रा. कापिल, ता. कराड), रामन गुंडा गुरुहार, आयुष सहेबराव आवळे (रा. वडगाव हवेली, ता. कराड), विजय कृष्णराव भंडारे, शिवाप्पा मरनिंगप्पा लाळसिंगी (रा. भुयार, ता. इंडी, जि. विजापूर), बसचालक धर्माप्पा निमप्पा नाईक (रा. मेडीकेश्वर, ता. मुद्देबिहार, जि. विजापूर, कर्नाटक) तसेच वाहक रामन यल्लापा गौंडा (रा. इब्राहिम, गणेशनगर, ता. विजापूर).