इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यावर आता कर्नाटक सरकारने बंदी केली आहे. प्लॅस्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असल्याने पुढील धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने प्लॅस्टिकविरोधी मोहिम तीव्र केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सुमारे 52 हॉटेल्समध्ये इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागाने राज्यभरातून इडलीचे सुमारे 250 वेगवेगळे नमुने तपासले. यापैकी 52 नमुन्यांमध्ये प्लॅस्टिकचा वापर केल्याचे आढळून आले. यानंतर कर्नाटक सरकारने कारवाईचा बडगा उगारत प्लॅस्टिक वापरावर कडक निर्बंध घातले आहेत.

प्लॅस्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असतात. प्लॅस्टिकचा वापर इडली बनवताना केल्यास त्यातील कर्करोगजन्य घटक इडलीमध्ये जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री म्हणाले. आरोग्य विभाग लवकरच असे होऊ नये याबाबत अधिकृत आदेश जारी करेल, असेही त्यांनी नमूद केले.