तैमूर आणि पापाराझी

फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूर अली खान पापाराझीबद्दल काय बोलतो याबद्दल सांगितले. जन्माला आल्यापासून पापाराझी त्याला फॉलो करतात. सात वर्षांचा तैमूर आणि दोन वर्षांचा जेह यांचे पालक म्हणून करीना व सैफ दोघेही सजग आहेत. मात्र त्यांनी कधीच पापाराझींना अडवले नाही. याबाबत करीनाने खुलासा केला की, तैमूर अनेकदा तिला विचारतो की तो व्हीआयपी आहे का? त्यावर ती त्याला आठवण करून देत असते की, त्याच्या पालकांमुळे तो लक्ष वेधून घेतो. ती म्हणाली की, त्याला याची सवय झाली आहे. त्याला ‘तुझा चेहरा लपव पिंवा असे करू नको, तसे करू नको’ सांगणे अवघड आहे. बेबो पुढे म्हणाली की, तैमूरला एवढे नक्की कळले आहे की, त्याला त्याच्या आयुष्यात व्हीआयपी बनण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. हा स्पॉट लाइट त्रासदायक आहे का? यावर ती म्हणाली, ‘नक्कीच, त्रासदायक आहे. सैफने सांगितल्याप्रमाणे गाडीपर्यंत जाईपर्यंत आम्ही नेहमी खाली मान ठेवून चालतो. ‘ये मत करो, वो मत करो…’ असे मुलांना सांगितले तर ते गोंधळात पडतात.’