“शब्द मागे घेते, मी आता कलाकारच नाही तर…”, कृषी कायद्यांसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या कंगनाला उपरती

शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार कंगना रणौतला अखेर उपरती झाली असून तिने आपले शब्द मागे घेतले आहेत. कंगनाने या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपण कृषी कायद्यासंदर्भात पक्षासोबत उभी असून माझे शब्द मागे घेते असे तिने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मला कृषी कायद्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता आणि शेतकऱ्यांनी पंतप्रधानांकडे हे कायदे पुन्हा लागू करण्याचे विनंती करायला हवी असे मी म्हणाले. माझ्या या बोलण्याने अनेक जण निराश झाले. कृषी कायदा आला तेव्हा अनेकांनी याचे समर्थन केले होते. त्यानंतर मोठ्या खेदाने हे कायदे रद्द करण्यात आले, असे कंगना म्हणाली.

मी आता कलाकारच नाही तर भाजपची कार्यकर्तीही आहे हे मला लक्षात ठेवावे लागेल. माझी मतं माझी नाही तर पक्षाची हवीत. जर माझ्या शब्दांनी कुणाला त्रास झाला असेल तर मी खेद व्यक्त करते आणि माझे शब्द मागे घेतले, असे कंगना म्हणाली.

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यानच अनेक हत्या आणि बलात्कार झाल्याचे ती म्हणाली होती. यानंतर तिला पक्ष नेतृत्वाकडून दट्ट्या पडला होता. भाजपने एक पत्रक जारी करत कंगनाने केलेल्या विधानाशी पक्षाचा संबंध नसून तिच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते.