कामाठीपुराचा कायापालट होणार, विकासक नेमण्यासाठी म्हाडा लवकरच निविदा काढणार

कामाठीपुराचा लवकरच कायापालट होणार आहे. येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी टोलेजंग टॉवर उभे राहणार असून पिढय़ान् पिढ्या 50 ते 180 चौरस फुटाच्या घरात राहणाऱया रहिवाशांना 500 चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे. बांधकामासाठी विकासक नेमण्याच्या हालचालींना वेग आला असून आचारसंहितेपूर्वी निविदा काढली जाणार आहे.

कामाठीपुरातील गल्ली क्र. 1 ते 15 मध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे आठ हजार रहिवासी आहेत. शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या इमारती दुरुस्तीपलीकडे गेल्या आहेत. याशिवाय 349 बिगर उपकरप्राप्त इमारती, 14 धार्मिक वास्तू, 2 शाळा आणि 4 आरक्षित भूखंड तसेच म्हाडाने बांधलेल्या 11 पुनर्रचित इमारती आहेत. इमारतींचा व भूखंडांचा समूह पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून व्हावा यासाठी महाविकास आघाडीच्या काळात प्रयत्न करण्यात आले होते.

लॉटरीसाठी हजारो घरे उपलब्ध होणार

कामाठीपुऱयाच्या पुनर्विकासासाठी विकासक नेमण्यासाठी निविदा काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून आचारसंहितेपूर्वी निविदा काढली जाईल. पुनर्विकासामुळे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला हजारो घरे उपलब्ध होऊ शकतील. ही घरे लॉटरीच्या माध्यमातून विकण्यासाठी मुंबई मंडळाला देण्यात येतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

जमीन मालकांना 50 चौ. मी. भूखंडाकरिता 500 चौरस फुटांची एक तर 51 ते 100 चौ.मी. भूखंडाकरिता 500 चौरस फुटांच्या दोन सदनिका, 101 ते 150 चौ. मी. भूखंडाकरिता 3 तर 151  ते 200 चौ. मी. भूखंडाकरिता 4 सदनिका देण्यात येणार आहेत. 200 चौ. मी. पुढील प्रत्येक 50 चौ. मी. भूखंडाकरिता 500 फुटांची 1 अतिरिक्त सदनिका मिळणार आहे.