डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी कायम, सर्व्हेमध्ये कमला हॅरिस वरचढ

अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधी नुकत्याच झालेल्या नव्या सर्व्हेनुसार, डेमोव्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी रिपब्लिक पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. ताज्या सर्व्हेनुसार, कमला यांना ट्रम्प यांच्या तुलनेत 6 पॉइंट जास्त मिळताना दिसत आहेत. 20 ते 22 सप्टेंबर झालेल्या या सर्व्हेत 785 मतदारांनी भाग घेतला. यात 50 टक्के लोकांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला, तर 44 टक्के लोकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महागाई, गर्भपात, आरोग्य, अर्थव्यवस्था, स्थलांतर या प्रमुख मुद्दय़ांवर निवडणूक लढवली जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस यांना 49.2 टक्के मते मिळू शकतात, असे ओपनियन पोल्सचा अंदाज आहे.

डिबेटनंतर कमला यांना पसंती
अमेरिकेतील डिबेटनंतर अमेरिकन जनतेची कमला यांना पसंती वाढली आहे. अमेरिकेच्या सट्टाबाजारात हॅरिस जिंकतील असे 52 टक्के तर ट्रम्प जिंकतील, असे 47 टक्के लोकांना वाटत आहे.