छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाजवळील कामा रुग्णालयाच्या गोदामाला रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. यावेळी सुदैवाने काही निवासी डॉक्टरांनी आगीचा अंदाज येताच सतर्कता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.
कामा रुग्णालयाच्या गोदामास मध्यरात्री दीडच्या सुमारास फटाक्यांमुळे आग लागली. या गोदामात रुग्णालयातील जुन्या गाद्या, उश्या, खुर्चा व भंगाराचे साहित्य ठेवले होते. हे सर्व भंगार साहित्यामुळे आग आणखीनच भडकली. यावेळी शेजारील ओपीडी असलेल्या इमारतीत धुराचे लोट पहिल्या मजल्यापर्यंत पोहताच रूममध्ये अभ्यास करणाऱया डॉ. अंकिता पाठक व डॉ. आनुशा गुगोलोट यांनी सर्वांना अलर्ट केले. त्यामुळे धुराचा कोणत्याही कर्मचारी, परिचारिका व डॉक्टरांना त्रास जाणवला नाही. दरम्यान, आगीची माहिती तातडीने कर्मचाऱयांनी अग्निशमन दलास व पोलिसांना माहिती दिली. तत्काळ अग्निशमन दलाचे जवान व रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पालवे घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने रात्री उशिरा आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.