काळा घोडा महोत्सवाला सशर्त परवानगी, मैदानावर अल्पोपहार आणि खाद्यपदार्थ विक्री नाही

येत्या 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत संपन्न होणारा आणि वारसा जपणारा उत्सव अशी ओळख असलेला दक्षिण मुंबईतील काळा घोडा महोत्सव क्रॉस मैदानावर आयोजन करण्यास मंगळवारी उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.

मात्र, क्रॉस मैदानावर अल्पोपहार आणि व्यावसायिक स्टॉल लागणार नाही, अशी हमी काळा घोडा असोसिएशनकडून मिळाल्यानंतर न्या. गौतम पटेल आणि न्या. कमल खता यांच्या खंडपीठाने असोसिएशनला महोत्सव आयोजित करण्यात परवानगी दिली. तसेच आयोजकांकडून न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन होणार असेल तर यापुढे त्यांना न्यायालयात महोत्सवाच्या आयोजनासाठी दाद मागण्याची आवश्यकता नाही, ते थेट पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परवानगी घेऊ शकतात, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलं.

काळा घोडा महोत्सवाच्या परवानगीसाठी ऑर्गनायझेशन फॉर व्हरडंट अॅम्बियन्स अँड लँड (ओव्हीएएल) या सार्वजनिक संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. काळा घोडा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी चर्चगेटच्या क्रॉस मैदानावर घेतले जात होते. मात्र, हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. म्हणूनच काळा घोडा महोत्सव आयोजकांनी न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी आयोजकांनी साल 2018 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील अटींच्या हमीपत्राच्या अधीन असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच क्रॉस मैदानावर कोणतेही अल्पोपहार आणि व्यावसायिक स्टॉल लावण्यास प्रतिबंधित असून मैदानाचा वापर कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी होणार नाही आणि महोत्सव विनाशुल्क असेल. मैदानाच्या सार्वजनिक बागेचा कोणताही भाग उत्सवादरम्यान वापरला गेला असेल तर आयोजक त्याच्या मूळ स्थितीनुसार स्वखर्चाने तो पुनर्संचयित करून देतील, असेही खंडपीठाने आदेशात अधोरेखित केले आहे.