मुरगूडमध्ये उपनगराध्यक्षांच्या दालनात नमाज पठण, शहरात तणाव; पोलीस बंदोबस्त तैनात, दोघे ताब्यात

कागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये नमाज पठण करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला असून, शेकडो तरुणांनी पालिकेसमोर निषेधार्थ घोषणाबाजी केली. मात्र, पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, परिविक्षाधिन डीवायएसपी अरविंद रायबोले, कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अब्दुलगणी सलाउद्दीन बागवान (वय 37), अहमद अमानुल्ला आजरवी (वय 35, दोघेही रा. निपाणी, ता. चिकोडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नमाज पडण्यासाठी उपनगराध्यक्ष केबिन उपलब्ध करून देणाऱया पालिकेच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱयांवर कारवाई करणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.

मंगळवारच्या आठवडा बाजारासाठी आलेले दोन मुस्लिम व्यापारी सायंकाळी पालिकेत नमाज पडत असल्याचे काही तरुणांना समजले. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी नगरपालिकेमध्ये कोणीही अधिकारी अथवा शिपाई हजर नव्हते. उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये घडलेल्या प्रकारामुळे संतप्त तरुणांनी अधिकाऱयांच्या राजीनाम्याची मागणी केली. हजारो तरुणांचा जमाव नगरपालिकेवर जमला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुरगूड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुरगूडमध्ये कडकडीत बंद

मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने संतप्त झालेल्या तरुणांनी आज शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील हजारो तरुण पालिकेच्या इमारतीजवळ जमा झाले होते. यावेळी दोषींना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नामदेवराव मेंडके, दगडू शेणवी, सुशांत कलकुटकी, विजय गोधडे, श्रीकांत शिंदे, गुरुदेव सूर्यवंशी, सत्यजित गोधडे, नंदकुमार खंडागळे, अनिकेत वंडकर, प्रकाश मेंगाणे, धीरज गोधडे, संग्राम साळोखे, बळीराम दबडे, प्रदीप पाटील, रोहित कोळेकर, विशाल आर्डेकर, अतुल आमते, संतोष भोसले, समाधान पोवार, मयूर सावर्डेकर, दिग्विजय चव्हाण, संदीप भारमल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.