दडपशाही सरकार विरोधातील लढाईत विनेश फोगाट विजयी; निवडणूक निकालानंतर बजरंग पुनियाची प्रतिक्रिया

हरयाणा विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट हिने दणदणीत विजय मिळवला. विनेश जुलाना मतदारसंघातून 6 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाली आहे. विनेशच्या विजयानंतर काँग्रेस गुलाल उधळला आहे.  विजयावर तिचा सहकारी बजरंग पुनियाने विनेशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बजरंग पुनियाने सोशल मीडियावर विनेशच्या विजयाची पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने विनेशचा एक फोटो शेअर करून जुलाना विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. “देशाची कन्या विनेश फोगाटचे तिच्या विजयासाठी खूप खूप अभिनंदन..! ही लढाई फक्त जुलाना जागेसाठी नव्हती किंवा फक्त पक्षांची लढाई नव्हती. तर ही लढाई देशातील दडपशाही सरकार विरोधातील होती. या लढाईत विनेशचा विजय झाला आहे, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विनेश फोगाटच्या विजयानंतर जुलाना मतदारसंघात जल्लोषाचे वातावरण आहे. जुलाना मतदारसंघात विनेशचा हा विजय विशेष मानला जात आहे. काँग्रेसचा उमेदवार शेवटचा 2005 ला येथून विजयी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे.

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विनेशने 6 सप्टेंबर रोजी तिचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.