महाविकास आघाडीची 16 ऑगस्टला मुंबईत संयुक्त सभा; विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत रणशिंग फुंकले जाणार आहे. 16 ऑगस्टला माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह आघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज शिवालय येथे झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर दिली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आजच्या या बैठकीत उपस्थित होते. तिन्ही पक्षांनी संयुक्त जाहीरनामा, किमान समान कार्यक्रम आणि पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या जाहीरनाम्यावर काम सुरू आहे. ऑगस्टअखेरीस आणखी एक किंवा दोन बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात जागावाटपासह इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

आजच्या बैठकीला शिवसेनेकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते विनायक राऊत, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, सुनील भुसारा उपस्थित होते.