महाराष्ट्रही भाजपला नाकारेल, जम्मू-कश्मीर आणि हरयाणाच्या निकालावरून अरविंद सावंत यांना विश्वास

जम्मू-कश्मीर आणि हरयाणात कोणाचे सरकार येणार याचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या पहिल्याच निवडणुका होत असून या निकालांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या मतमोजणी ट्रेंडनुसार हरयाणामध्ये काँग्रेसच्या बाजूने कल राहिला आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहेत. दरम्यान, या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया केली आहे.

अरविंद सावंत यांनी जम्मू- काश्मीर आणि हरयाणातील निकालावरून सरकारवर निशाणा साधला. “देशाचा निर्णय झाला आहे. लोकांनी भाजपला नाकारले आहे. महाराष्ट्रातही असेच होईल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही जम्मू – काश्मीर आणि हरयाणामधील लोकांच्या निर्णयाचे स्वागत करतो, असे अरविंद सावंत म्हणाले.

महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे या दोन राज्यांचे कौल महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे जम्मू-कश्मीर आणि हरयाणातील भाजपची सुरुवातीची पिछाडी पाहता, लवकरच जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही असाच निकाल पाहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्रातील विरोधकांनी केला आहे.