“दैवतालाच तुम्ही मंदिराबाहेर काढायला निघालात अन्…”, शरद पवारांना दैवत म्हणणाऱ्या अजितदादांवर आव्हाडांचा हल्लाबोल

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून 28 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वांच्या नजरा याकडे लागलेल्या असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील कुरबुरीही वाढल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारत आमदारांसह बंड केले आणि ते सत्तेत सहभागी झाले. मात्र निवडणुकीत त्यांना विशेष यश मिळाले नाही. त्यांचा एकच खासदार निवडून आला. आता विधानसभेआधी त्यांनी सावध भूमिका घेत शरद पवार हे आपले दैवत आहेत असे म्हणत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करून अजित पवारांचा समाचार घेतला आहे.

अजित पवार आपल्या भाषणात असे म्हणाले की, आदरणीय शरद पवारसाहेब हे आपले दैवत आहेत. ते असेही म्हणाले की, “आम्हाला जे करायचे आहे ते करू द्या”. तुम्ही जातीयवादी शक्तींच्या सोबत जाणार आणि धर्मनिरपेक्षतेचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणाऱ्या आदरणीय साहेबांना दैवत म्हणणार! तुम्ही वेळोवेळी त्या दैवताचा अवमानच केला आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

त्यांनी अजित पवारांना उद्देशून पुढे म्हटले की, गेल्या 15 वर्षात तुमची प्रत्येक भूमिका ही त्या दैवताच्या विरोधातच होती. पण, हे दैवत कधी बोलले नाहीत. ते गप्पच होते. पण, या दैवतालाच तुम्ही मंदिराच्या बाहेर काढायला निघालात अन् वर दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका. ते देव नाहीत ते माणूस आहेत. गेले 60 वर्ष ते पुरोगामी विचारधारेचा झेंडा घेऊन महाराष्ट्रभर फिरत आहेत.

राजकारणात सर्वात महत्वाची असते ती विचारधारा. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आणि धर्मनिरपेक्षता या विचारांवरच महाराष्ट्र उभा राहिला आहे. तेव्हा महाराष्ट्रात गोंधळ घालून नका; महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका. तुम्ही ज्याला दैवत म्हणताय त्याने तुम्हाला बाहेर काढले नव्हते. तुम्हीच बाहेर पडला आहात. आता तुम्ही ज्याला देव म्हणताय तो देव आता महाराष्ट्रात फिरतोय. त्या देवाने लोकसभेत जे घडविले… तेच आता विधानसभेतही दिसेल! पण हे दादा आपण बोललात की design box च्या आरोरानी सांगितले होते असे बोला, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.