हिंमत असेल तर समोरून वार करा, भ्याडासारखे…; हेमंत सोरेन यांचा भाजपवर हल्लाबोल

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, हिंमत असेल तर समोरून लढा, भ्याड इंग्रजांप्रमाणे मागून वार काय करता? असा संतप्त सवाल हेमंत सोरेन यांनी भाजपला केला आहे. शिवाय आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी भरपूर पैसे खर्च केले आहेत, असा हल्लाबोल हेमंत सोरेन यांनी भाजपवर केला आहे.

हेमंत सोरेन यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले की, कधी ईडी, कधी सीबीआय तर कधी अन्य एजन्सी तर कधी आणखी काही. आता माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी अरबो रुपये खर्च केले जात आहेत. परिस्थिती विचित्र आहे. सोरेन यांनी भाजपच्या डबल इंजिन सरकारवर निशाणा साधला. म्हणाले की, भाजप सरकारकडे राज्यामध्ये जवळपास 5 वर्षांपूर्वी सत्ता होती आणि त्यांनी शाळा बंद केल्या. अनेकांचे रेशन कार्ड रद्द केले. झारखंड लोक सेवा आयोगाच्या परीक्षाही घेतल्या नाहीत. सोरेन म्हणाले की, भाजप सरकार 11 वर्ष केंद्रात आणि 5 वर्षे राज्यात सत्तेववर राहिली. स्वत:ला डबल इंजिन सरकार सांगतात. मग रघुवर सरकारच्या पाच वर्षात 13 हजार शाळा का बंद पाडल्या? असा सवाल केला आहे.

सोरेन पुढे म्हणाले, भाजप सरकारने पाच वर्षात 11 लाख रेशन कार्ड रद्द केले आहेत. या दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाच्या परीक्षाही घेतल्या नाहीत. भाजपमुळे विधवांना पेन्शनही मिळाले नाही. भाजप सरकारमध्ये पाच वर्षात राज्यात शेकडो लोक भुकेने का मेले? पाच वर्षात तरुणांना सायकल बनवणे आणि केळी विकण्याचा सल्ला का दिला गेला? असा संतप्त सवाल सोरेन यांनी केला. आपले सरकार आल्यास लोकांच्या हिताचे आणि झारखंडमधील प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे काम करतच राहणार, असा विश्वास हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला.