आम्ही सुरू केलेला लढा शेवटपर्यंत लढू; वडिलांना भेटल्यानंतर हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला निर्धार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तब्बल 149 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. रांचीच्या बिरला मुंडा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सोरेन यांनी वडिल शिबू सोरेन यांना भेटण्यासाठी घरी गेले होते. त्यांनी बऱ्याच काळानंतर वडिलांची भेट घेतली. त्यामुळे ते  भावूक झाले. वडिलांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही सुरू केलेला लढा शेवटपर्यंत लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रांचीमध्ये हेमंत सोरेन म्हणाले की, तब्बल 5 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आलो आहे. मागचे पाच महिने झारखंडसाठी चिंतेचे होते. मी तुरुंगात का आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अखेर न्यायालयाने मला न्याय दिला आहे. त्यामुळेच मी तुरुंगातून बाहेर येऊ शकलो आहे. त्यामुळे मी न्यायालयाचा आदर करतो. आज हा संपूर्ण देशासाठी संदेश आहे की, माझ्या विरोधात कसे षड्यंत्र रचले गेले. न्यायालयीन प्रक्रियेला अनेक महिने नव्हे तर वर्षे लागतात. पुढे ते म्हणाले की, खोटे आरोप करत मला पाच महिने तुरुंगात डांबण्यात आले. तसेच सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशाच्या विविध भागात तुरुंगात टाकण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. मंत्री असतानाही लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. न्यायप्रक्रियेला एवढा वेळ लागत आहे की, दिवस नाही तर वर्षे लागत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

हेमंत सोरेन म्हणाले की, जी लोकं आपापल्या राज्य, समाज आणि देशाप्रती जबाबदारी पूर्ण समर्पणाने पार पाडत आहेत, त्यांच्यावर खोटे आरोप करुन तुरुंगात डांबले जात आहे. आज मी जास्त काही बोलणार नाही, पण आज मी पुन्हा एकदा जनतेमध्ये आहे. आमची लढाई अंतिम टप्प्यात नेण्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू. सोरेन पुढे म्हणाले की, संपूर्ण देशासाठी हा संदेश आहे की आपल्याविरोधात कसे षड्यंत्र रचले गेले आहेत. आता न्यायालयाचा आदेश तुमच्यासमोर येणार आहे. या संदर्भात मला जास्त काहीही बोलायचे नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अधिक चांगल्या पद्धतीने आढावा घेतल्यास सर्व काही कळेल.

झारखंडमधील जमीन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने 31 जानेवारीला हेमंत सोरेन यांना अटक केली होती. अटकेच्या काही तास आधी सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ईडीने त्यांना रांचीच्या राहत्या घरातून अटक केली होती. अटकेनंतर त्याला रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सोरेनची आता तुरुंगातून सुटका झाली आहे.