झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का, घराणेशाहीचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून भाजपकडून 66 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपवर घराणेशाहीचा आरोप करत पक्षाला रामराम ठोकला आहे.

भाजपकडून यादी जाहीर होताच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात देखील प्रवेश केला आहे. तर काही इच्छूक ही निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

सोमवारी लोईस मरांडी, कुणाल सारंगी, लक्ष्मण टुडू या तीन माजी आमदारांनी, शिवाय तीन वेळा आमदार राहिलेले केदार हजारा तसेच उमाकांत रजक यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला आहे.

भाजपची यादी पाहिली तर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. जवळपास 50 टक्के उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत, असे एका भाजप नेत्याने पदाचा राजीनामा देत म्हटले आहे. दुसऱ्या पक्षावर घराणेशाहीचे आरोप करणाऱा पक्ष स्वत:च घराणेशाहीचा बळी पडल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.