रस्त्यावरुन चालले तरी पोलीस लावत आहेत दंड, वाचा काय आहे प्रकरण

सर्वच देशांमध्ये ट्राफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते. बऱ्याच वेळा मोठी रक्कम दंड स्वरुपात भरावी लागते. मात्र, दुबईमध्ये चक्क रस्त्यावरून चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे अनेक नागरिकांना दंड ठोठावला आहे.

गगनाला भिडणाऱ्या इमारती, स्वच्छ सुंदर रस्ते आणि निळ्याशार समुद्राच्या कुशीत वसलेलं दुबई शहर ट्राफिकच्या कडक नियमांसाठी ओळखलं जातं. त्यामुळे वाहन चालकांना दुबईमध्ये ड्रायव्हिंग करताना चांगलीच कसरत करावी लागते. परंतु, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार रस्त्यावरुन चालताना ट्राफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 37 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

गल्फ न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, धोकादायक पद्धतीने रस्ता क्रॉस करने आणि ट्राफिक सिग्नलकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी दुबई पोलिसांनी 37 लोकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली असून 400 युएइ दिरहामचा दंड ठोठावला आहे. दुबईमध्ये Jay walking चा कडक कायदा आहे. जे वॉकिंग म्हणजे ट्राफिकच्या नियमांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने रस्ता क्रॉस करणे होय. याप्रकरणी दुबईमध्ये 2023 साली तब्बल 44 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.