वीज दरवाढीचा शॉक आणि निसर्ग!

>> जयेश राणे

वीज दरवाढीचा आलेख वाढत कुठपर्यंत जाणार आहे? याची चिंता सामान्य लोकांना आहे, पण निवडणुकीत मग्न असलेल्या सत्ताधाऱयांना याची चिंता अजिबात नाही. इंधन व घरगुती उपयोगाचा सिलिंडर यांचे दर कमी करून जनतेला बसत असलेल्या आर्थिक चटक्यांची किती काळजी आहे? असे दाखवायचे आणि दुसरीकडे वीज देयकात वाढ करून शॉक द्यायचा. हा दुटप्पीपणा नव्हे तर काय? एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तर दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. राज्याच्या काही भागांत एप्रिल महिन्याच्या आधीपासूनच पारा 42 अंशांपर्यंत गेला. त्यात महावितरणने वीज ग्राहकांना 15 ते 40 टक्के दरवाढीचा शॉक देत घाम पह्डला आहे. सामान्य नागरिक कायम हाच विचार करतो की, उन्हाळय़ाचे विशेषतः एप्रिल-मे हे दोन महिने आणि पावसाळा लांबल्यास जूनचे काही दिवस विजेचा उपयोग जास्त होईल. त्यामुळे येणाऱया वाढीव वीज देयकाची कळ निमूटपणे सोसायची. वीज दरवाढीचा शॉक म्हणजे तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

वेळेत वीज देयक भरणारे म्हणजे ग्राहक. महावितरणला सहकार्य करणारे ग्राहक होय. उपयोग केलेल्या विजेचे देयक वेळेतच भरले पाहिजे, याची जाण त्यांना असते. हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे. वीज देयक थकवणारी बडी धेंड म्हणजे महावितरणलाच शॉक देणारे फुकटे होय. उपयोग करत असलेली वीज आपल्यासाठी फुकटच आहे, हा कुसंस्कार त्यांच्या मनावर बिंबला आहे. या फुकटय़ांकडून तसेच आकडे टाकून वीज वापरणाऱया लबाडांकडून दंडासह वीज देयक वसूल करण्याला पर्याय नाही. यांचे ओझे प्रामाणिक जनतेने का वाहायचे? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय लबाडांची मुजोरी शक्य आहे का? वीज देयकाची वसुली करण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी वर्गावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत हेही विसरता नये.

सामान्य लोकांची उष्णतेने होणारी होरपळ ही त्यांची कठीण परीक्षाच होय. ऐन उन्हाळय़ात वीज दर वाढवणे म्हणजे ग्राहकांची जाणीवपूर्वक केलेली थट्टा होय. वीज नियामक आयोगाच्या शिफारसीकडे वीज दरवाढीसंदर्भात बोट दाखवायचे आणि स्वतः नामानिराळे राहायचे, असे लोकप्रतिनिधींचे धोरण आहे.

खेडेगावात काही लोकांची घरे टीनच्या पत्र्यांची आहेत. उन्हाळय़ात विशेषतः दुपारच्या वेळेत अशा घरी थांबणे अशक्यच. पूर्ण घर तीव्र उष्ण हवेने व्यापले जाते. पंखा उष्ण हवेचा मारा करत राहतो. सूर्यास्त झाल्यावर काही कालावधीने या गरम हवेची तीव्रता कमी झाल्यावर दिलासा मिळतो. पंजाब, दिल्लीप्रमाणे ठरावीक युनिटपर्यंत विनामूल्य विजेची मुळीच अपेक्षा नाही. कारण ते सरकारच्या तिजोरीत गोळा होणाऱया महसुलात घट करणारे आहे. तेव्हा वीज दरवाढ न करता काही वर्षे दर स्थिर ठेवले तरी ग्राहक त्यात समाधानी राहतील. पण उन्हाळय़ात होणाऱया तापमान वाढीची नामी संधी पाहून दरवाढीच्या जाळय़ात ग्राहकांना अडकवून ठेवण्याचा प्रकार निर्लज्जपणाचा आहे.
वीज दरवाढीचा आलेख वाढत कुठपर्यंत जाणार आहे? याची चिंता सामान्य लोकांना आहे, पण निवडणुकीत मग्न असलेल्या सत्ताधाऱयांना याची चिंता अजिबात नाही. इंधन व घरगुती उपयोगाचा सिलिंडर यांचे दर कमी करून जनतेला बसत असलेल्या आर्थिक चटक्यांची किती काळजी आहे? असे दाखवायचे आणि दुसरीकडे वीज देयकात वाढ करून शॉक द्यायचा. हा दुटप्पीपणा नव्हे तर काय?

भारतात सूर्य प्रकाश विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. उन्हाळय़ात तर याची उपलब्धता किती मुबलक प्रमाणावर असते याची कल्पना सर्वांना आहेच. वीज दरवाढीचे चटके सहन करायचे नसल्यास सौर ऊर्जेच्या उपयोगाला पर्याय नाही. हा ऊर्जेचा एकमेव नैसर्गिक स्रोतच दिलासा देणारा आहे. मात्र अद्यापही भारतात त्याविषयी असलेले गांभीर्य आणि जागरूकता नगण्य आहे. त्यामुळे ऊर्जेचा विनामूल्य स्रोत उपलब्ध असूनही आणि त्याला आपल्याकडे वळवण्यास थोडे पैसे खर्च करावे लागणार असूनही त्याकडे नागरिकांकडून दुर्लक्षच होत आहे.

शहरांत इमारती उभ्या राहत आहेत. हीच स्थिती ग्रामीण भागात तालुका स्तरावर आहे. गच्चीवरील भागातून पावसाळय़ात पाणी झिरपत राहून इमारत अल्पायुषी होऊ नये, यासाठी गच्चीवर पत्रे ठोकून गच्ची झाकली जाते. त्यामुळे सौर उर्जेचे मार्गच बंद करून ठेवण्यात आले आहेत. पावसाळय़ाच्या पाण्याच्या लिकेजच्या समस्येवर अनेक उत्तम उपाय आहे. त्यासाठी पत्र्याची शेड उभारून गच्ची झाकणे हा पर्याय नाही. कोणत्या समस्येवर काय तोडगा काढता येईल ? याचा बारकाईने विचार केला तर चांगले.

झाडांपेक्षा वातानुकूलित यंत्र, कुलर अधिक जवळचे वाटतात. त्यामुळे उष्णता वाढली की यांना मागणीही वाढते. उन्हाळय़ाच्या दिवसांत याचा उपयोग करायचा. उपयोग न केल्याने ते बंद पडू नये, म्हणून अधूनमधून काही मिनिटे चालू करून पाहायचे. अशी मानसिकता झाल्याने झाडे लावा आणि त्यांचे संवर्धन करा. हा विषयच कालबाह्य झाला आहे. वातानुकूलित यंत्राचा उपयोग केल्यास विजेचे देयक पुष्कळ येईल. या भीतीने श्रीमंत वर्गच हमखास वातानुकूलित यंत्राचा उपयोग करत असे. पण आता मात्र मध्यमवर्गही कृत्रिम थंडावा मिळण्यासाठी वातानुकूलित यंत्राचा मुक्तहस्ते उपयोग करू लागला आहे. वृक्षारोपण करून नैसर्गिक थंडावा मिळावा यासाठी धडपड करणारे हाताच्या बोटावर मोजावे इतकेच आहेत.

राज्यकर्ते केवळ छायाचित्रे काढण्यासाठी वृक्षारोपण करताना दिसतात. विकासावर, राजकीय उणीदुणी काढण्यासाठी भरभरून बोलतात. पण निसर्गात वाढ करणे व त्याचे संवर्धन करणे या विषयावर कोणीच का बोलत नाही? राजकारण बाजूला ठेवून आगामी 25 – 30 वर्षांत निसर्गाच्या वाढीसाठी काय नियोजन आहे, त्याविषयी बोलले पाहिजे. महाराष्ट्र आणि देशाच्या काही भागांत पाण्यासाठी एप्रिल महिन्याच्या आधीपासूनच वणवण चालू झाली आहे. टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहे. ते ही पुरेसे नाही. भूजल पातळी कमी होत आहे. दरवर्षीची ही समस्या आहे. पण त्यावर टँकरने पाणी पुरवठा हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. वारंवार निसर्गाचा असमतोल होत राहिल्याने भूपंपासारखी विनाशकारी आपत्ती येऊ शकते. विकासाची भूक असावी, पण त्यासह निसर्गाचा समतोलही साधला पाहिजे. तो ढासळत असल्याने ऋतूचक्र बिघडले आहे. तरीही आपण पुंभकर्णाच्या निद्रेतून जागे होण्यास सिद्ध नाही. जे वाईट व्हायचे ते सगळय़ांसह होईल, असा विचार करून थंड बसत आहोत.

वाहनांची संख्या अनिर्बंधपणे वाढत आहे, तसे वायुप्रदूषणही वाढत आहे. झाडे दिसेनाशी झाल्याने वाढलेल्या प्रदूषणामुळे स्वच्छ हवेच्या अभावी मोकळा श्वास घेता येत नाही. महागाई समाधानाने चार घास खाऊ देत नाही. पंख्याची साधी हवा का होईना ती ही वीज दरवाढ घेऊ देत नाही. पंखा क्षणभरही बंद करू शकत नाही की, लगेच घामाच्या धारा चालू होतात. निसर्गाचे पंख छाटल्याने आणि दाटीवाटीच्या वस्तीने तर हवा वाहण्यास मार्गच ठेवलेला नाही. पंख्यास चालना देणारी वीज नसेल तर काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही. इतके आपण विजेवर अवलंबून आहोत. त्यामुळे दरवाढीच्या झळा सोसण्याची मनाची तयारी असली तरी विविध कटकटी कमी म्हणून की काय कधी कोणती दरवाढ अचानकपणे आगीतून फुफाटय़ात लोटेल याचा नेम नाही. एपंदरीत जनता नानाविध कटकटींनी पिचली आहे. नोकरी व व्यवसाय करून ती या गटांगळय़ा खात कसेबसे जीवन जगत आहे. अशा तणावपूर्ण आयुष्याला महावितरणने वीज दरवाढीचा शॉक देऊन काय मिळविले?

[email protected]