लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा, जयंत पाटील यांचा मिंधे सरकारला टोला

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी राज्य सरकारकडून वारेमाप खर्च केला जात आहे. शहरातील सर्व फाईव्हस्टार हॉटेल बुक केले असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान मालेगावमधील एका शेतकऱ्याला 112 क्विंटल कांद्यासाठी अवघे 252 रुपयांचे अनुदान मिळाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही गोष्टींवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

”एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, 300 गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट. दुसरीकडे मात्र कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केलेले असताना, मालेगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर 112 क्विंटल कांद्याचे अवघे 252 रुपये अनुदान जमा करत क्रूर थट्टा केली आहे. लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.