सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही; जयंत पाटील यांची अजित पवार गटावर टोलेबाजी

‘‘आमच्यातून तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीदरबारात सहाव्या रांगेत उभे राहावे लागत आहे. विकासकामांच्या नावाखाली सत्तेसाठी लाचारी पत्करणे योग्य नाही. विकासासाठी गेलात, परंतु कोणत्या विचारसरणीसोबत आपण काम करतो आहोत, याला महत्त्व आहे,’’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर केला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’चा आज मोहटादेवी गडावरून शुभारंभ झाला. या वेळी जयंत पाटील बोलत होते. या कार्यक्रमा वेळी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह शिवसेना, काँगेससह मित्रपक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पह्नवरून उपस्थितांना संबोधित केले.

‘‘लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अजून अवधी असतानाही कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता नगर दक्षिण मतदारसंघाचा निकाल आजच लागला असून नगर दक्षिणचा गड नीलेश लंके हेच सर करतील,’’ असा विश्वास व्यक्त करीत जयंत पाटील म्हणाले, ‘‘जनसामान्यांनी खांद्यावर घेतलेल्या नीलेश लंके यांच्यासारख्या नेतृत्वाला आता कोणीही थोपवू शकत नाही. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श लंके यांनी घालून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठी नीलेश लंके दिल्लीत आवाज उठवतील. त्यामुळे लंके यांच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस उभा आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

आमदार नीलेश लंके म्हणाले, ‘‘आज मोहटादेवीचे दर्शन घेऊन आपण ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’ला सुरुवात केली आहे. आता ही स्वारी दिल्लीत पोहोचल्याशिवाय थांबणार नाही. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून किमान दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘आपण आव्हान उभे केल्यामुळेच विरोधकांवर साखर, डाळ वाटण्याची वेळ आली,’’ असा टोलाही लंके यांनी सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला.

कधीकाळी लंके शिवसेनेचेच -संजय राऊत

‘‘हुकूमशाही संपविण्यासाठी, संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही नीलेश लंके यांच्यासोबत आहोत. कधीकाळी नीलेश लंके हे शिवसेनेचेच होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम आशीर्वादच दिलेले आहेत. आजच्या या शुभारंभासाठी इच्छा असूनही येता आले नाही. या यात्रेच्या सांगतेसाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी येण्याचे मान्य केले आहे. यात्रेदरम्यान आपणही हजेरी लावू,’’ असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सांगितले.