राजकीय नेत्यांची विश्वासार्हता चिंतेचा विषय – जयंत पाटील

राजकारणी स्वतःच्या पायापुरते बघत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची विश्वासार्हता हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे तात्पुरत्या मिशनवर शॉर्टटर्म गेम करण्यासाठी पडेल ते निर्णय घेणे टाळले पाहिजे. राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र व्हिजन-2050’ या विषयावर जयंत पाटील बोलत होते.  राजकारण्यांची विश्वासार्हता वाढवावी लागेल हे सर्वांपुढील आव्हान आहे. कारण निवडून आल्यानंतर कोण कुठल्या पक्षात जाईल याचा भरवसा नागरिकांना राहिला नाही. याचा परिणाम थेट राज्याच्या प्रशासनावर पडतो. राजकारण्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचीदेखील आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.