जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; गोदापात्रात साडेनऊ हजार क्युसेक्सचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे

तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग केला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी माहिती दिली.

सोमवारी 9 सप्टेंबर रोजी 11, 12, 13, 14, 25 आणि 26 क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले. यातून 3 हजार 144 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढत असल्याने सोमवारी सायंकाळई जलविसर्गामध्ये वाढ करावी लागली. सायंकाळी आणखी 6 दरवाजे उघडून 7 हजार क्युसेक्सचा जलविसर्ग गोदापत्रात सुरू झाला.

मंगळवारीही पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढत राहिल्याने दुपारी साडे अकराच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाच्या 27 पैकी 13, 224, 15, 22, 17 आणि 20 क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. अशा प्रकारे 27 पैकी 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्सुसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, विसर्ग वाढल्याने पैठण शहरासह तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण शहर, पाटेगाव, कावसान, नायगाव, मायगाव, वडवाळी, वाघाडी, नवगाव, आगरनांदुर, आवडे उंचेगाव, चनकवाडी, टाकळी अंबड, हिरडपुरी व आपेगाव या पुरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या 16 गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.

या विसर्गामुळे गोदापात्रातील पाणीपातळी वाढणार असल्याने गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी न्यावे असे आवाहनही तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केले आहे.