अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेप व 16 लाखांचा दंड ठोठावला. हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी 23 वर्षांनंतर न्यायालयाने छोटा राजनला भारतीय दंड संहिता व ‘मोक्का’ कायद्याखाली दोषी ठरवले. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर राजन टोळीच्या गुंडांनी शेट्टी यांची गोळय़ा झाडून हत्या केली.
सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी छोटा राजनच्या सहभागाचे भक्कम पुरावे सादर केले. तसेच 32 साक्षीदार तपासले. साक्षीदारांमध्ये जया शेट्टी यांचे मुलगे मोहन व मनोहर यांचाही समावेश होता. मागील पाच वर्षे हा खटला चालला. सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर अटक करून हिंदुस्थानात आणले होते. महाराष्ट्रात जवळपास 70 गंभीर गुह्यांत तो आरोपी आहे. पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेप भोगत आहे.
प्रकरण काय?
गावदेवी येथील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक जया शेट्टी यांच्याकडे छोटा राजनने 50 हजारांची खंडणी मागितली होती. शेट्टी यांनी खंडणी द्यायला नकार दिला. त्यावर राजनने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी शेट्टी यांना सुरक्षा पुरवली होती, मात्र काही महिन्यांनी सुरक्षा हटवल्यानंतर पुढच्या काही महिन्यांतच राजन टोळीतील दोघा गुंडांनी शेट्टी यांच्यावर गोळय़ा झाडल्या. त्या हल्ल्यात शेट्टी यांचा जागीच मृत्यू झाला. 4 मे 2001 रोजी हॉटेलमध्ये शेट्टी यांची हत्या केली होती.
जया शेट्टी यांच्यावर गोळीबार करणाऱया तीन आरोपींना न्यायालयाने यापूर्वीच जन्मठेप सुनावली होती. विशेष न्यायाधीश ए. पी. भंगाळे यांनी हा निकाल दिला होता. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच शूटर्सनी शेट्टी यांच्यावर गोळय़ा झाडल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.