नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमध्ये भूकंप; त्सुनामीचा तडाखा

संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात मशगूल असतानाच सोमवारी दुपारी प्रचंड शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 7.4 एवढी झाली असून तीन तासांत तब्बल 30 जोरदार धक्के बसले. भूकंपामुळे जगातील सर्वात मोठय़ा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ 2 मीटरच्या उंच लाटा उसळल्या असून, त्सुनामीची भीती व्यक्त होत आहे. अनेक भागांतील वीज गायब झाली असून रेल्वेही बंद करण्यात आली आहे. इशिकावा प्रांतातील अनामिझू शहरात हा भूकंप झाला.

भूकंपानंतर अनेक भागांतील वीज गायब झाली असून काही भागांतील रेल्वे सुविधाही बंद करण्यात आली आहे. रस्त्यांवर भेगा पडल्याने वाहतूकही थांबविण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का बसलेल्या भागांतून लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

2012 मध्येही जपानमध्ये असाच विनाशकारी भूकंप झाला होता. समुद्राने रौद्ररूप धारण केले आणि महाकाय लाटांनी जपानी शहरे गिळंकृत केली होती. जपानची भूकंपरोधी यंत्रणा मजबूत असल्यामुळे या भूकंपात जास्त जीवितहानी झाली नव्हती. परंतु, मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.