काश्मीर तुमचा कधीच होणार नाही, फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला ठणकावले

जम्मू काश्मीरमधील गांदरबलमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात मजूरांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानवर सडकून टिका केली आहे.

फारुख अब्दुल्ला यांनी गांदरबलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सांगितले की, ही फार वेदनादायी घटना आहे. अनेक गरीब मजूर जे रोजगारासाठी काश्मीरला येतात. त्या बिचाऱ्यांना या क्रूरकर्मांनी शहीद केले आहे. त्यासोबतच आमचे एक डॉक्टर जे लोकांची सेवा करतात त्यांनीही आपला जीव गमावला आहे, आता सांगा, या लोकांना असे करुन काय मिळणार आहे? त्यांना असे वाटते की असे केल्याने कश्मीर पाकिस्तान होणार आहे का संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

फारुक पुढे म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून बघत आहोत की, लोकं येत आहेत. हे प्रकरण संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे. चला पुढे जाऊया. आपण कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. मला पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना सांगायचे आहे की, त्यांना हिंदुस्थानशी खरोखर मैत्री हवी असेल तर त्यांनी हे थांबवावे. काश्मीर पाकिस्तानचा कधीच होणार नाही. कधीच नाही. कधीच नाही.

ते म्हणाले, कृपया आम्हाला सुखाने राहू द्या, आम्हाला प्रगती करु द्या. किती दिवस तुम्ही असे हल्ले करणार? 1947 पासून तुम्ही हे सुरू केले आहे, अनेक निष्पाप लोक मारले गेले आहेत. त्य़ानंतर सुद्धा काश्मीर पाकिस्तानचे झाले का? 75 वर्षात पाकिस्तानचे झाले नाही तर आज कसा होणार? कृपा करून आपल्या देशाकडे पहा आणि आम्हाला जगू द्या. आम्हाला इथली गरिबी दूर करायची आहे. असेच चालू राहिले तर पुढे कसे जाणार?