समाजात द्वेष पसरवणे आणि सूडाचे राजकारण हेच भाजपचे धोरण; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

भाजप आणि संघपरिवार देशात द्वेष पसरवून दुहीची बिजे पेरत असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांना केवळ द्वेष पसरवणे माहित आहे आणि त्यांचे राजकारण सूडाचे आहे असाही निशाणा त्यांनी यावेळी साधला.

राहुल गांधी यांनी सोमवारी जम्मू काश्मीर येथील पूंछ येथे प्रचार रॅली काढली होती. यावेळी ते म्हणाले की, आमची प्रमुख मागणी आहे की, पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळावा. त्यासाठी आम्ही त्यांच्यावर दबाव आणू. त्यांनी तसे केले नाही तर आम्ही करु. नरेंद्र मोदी यांनी देशात बेरोजगारी पसरवली आहे. त्यांनी हजारो कोटी रुपये आपल्या मित्रपरिवाराला माफ केले आहेत. आम्हाला वाटते तुमचे सरकार तुम्ही चालवावे मात्र तुमचे सरकार दिल्लीतून चालते. तुमचे सरकार श्रीनगर आणि जम्मू येथून चालते असा हल्लाबोलही यावेळी केली. शिवाय द्वेषाने द्वेषाला संपवता येत नाही, तर तो प्रेमानेच संपवता येते असेही ते म्हणाले.

भाजप नेहमी समाजात तेढ पसरविण्याचे काम करतात आणि तेच त्यांनी येथे केले आहे. ते आमच्या पहाडी बांधवांना आणि गुर्जर बांधवांमध्ये आपापसात भांडाणे लावतात. आमच्यासाठी सर्व लोकं समान आहेत आणि आम्ही कोणालाही मागे सोडणार नाही. आम्ही सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन चालणार आहोत. तुम्ही आमच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करा असे आवाहनही यावेळी केले.

राहुल गांधी म्हणाले की, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. एवढ्या सुंदर ठिकाणी तूम्ही बोलावले, आज मी इथे फक्त दोन-तीन तासांसाठी आहे. तुम्हाला माझ्याकडून जे काही हवे आहे आणि जे काही मुद्दे तुम्हाला सरकारसमोर मांडायचे आहेत, ते तुमचे मुद्दे संसदेत मांडेन. पुढच्या वेळी दोन तीन दिवसांसाठी इथे येईन असेही ते म्हणाले.