जम्मू कश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; एक जवान शहीद, तीन जखमी

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मंगळवारी रात्री लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. जवानांना घेऊन जाणारे वाहन खोल दरीत कोसळले. या अपघातात एक जवान शहीद झाला असून तीन जखमी झाले आहे. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने चारही जवानांना दरीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. लान्सनायक बलजित सिंग असे अपघातात शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. ‘आज तक’ने जम्मू कश्मीर न्यूज नेटवर्कचा हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील मंजाकोट भागामध्ये मंगळवारी रात्री लष्कराचे वाहन दरीमध्ये कोसळले. यात लष्कराचे चार जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव पथकाच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन जवानांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमारेषेवर घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळून लावला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा यमसदनी पाठवले होते. गुप्तचर विभागाने दिलेल्या जम्मू-कश्मीर पोलीस आणि जवान अलर्ट झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.