जालन्यात बिबट्या! बकरी, 2 हरणांचा पाडला फडशा; वन विभागाने केली पुष्टी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील नाव्हा रोड सिंदखेडराजा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता वन विभागाचे कार्यालय असलेल्या कणकेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्या पहावयास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील शीतल बिहार कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे.

नागरिकांनी याची माहिती 7 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच सीसीटीव्ही फुटेज वन विभागाला दाखवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. टेलीकॉम कॉलनी, प्रशांतीनगर भागात रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने बिबट्याची दहशत आता जालना शहरात पाहायला मिळत आहे.

बिबट्याच्या शोधार्थ वन विभागाच्या पथकाकडून शीतल विहार परिसरात पाहणी सुरु करण्यात आली असून वन विभागाचे उद्यानही सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. वन विभागाकडून बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बिबट्याने परिसरात दोन हरण आणि एका बकरीचा फडशा पाडल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. दरम्यान, रात्री अपरात्री नागरिकांनी एकटे फिरू नये, सुनसान ठिकाणी जाऊ नये असे आवाहन वन विभागाचे अधिकारी कैलास नागरगोजे यांनी केले.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना कैलास नागरगोजे, वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोमळे, वनपरिमंडळ अधिकारी बदनापूर रेखा दुनगहू, वनरक्षक जालना बालाजी घुगे, वनरक्षक खांबेवाडी अशोक दांडगे, वनरक्षक चितोडा तेलग्रे आणि वनरक्षक उंबरी मुटके यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू केली.