लाठीहल्ल्यावरून उद्रेक; मिंधे सरकारविरोधात संतापाचा ज्वालामुखी फुटला, राज्यभरात तीव्र पडसाद

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱया मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यावरून मराठवाड्यात आज संतापाचा ज्वालामुखी फुटला. जालना शहरात बंदला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी वाहने पेटवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. बीडमध्येही अनेक ठिकाणी उग्र आंदोलन झाले. धाराशीवमध्येही दगडफेक झाली. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड तसेच लातूर येथेही लाठीमाराच्या निषेधार्थ संतप्त आंदोलन करण्यात आले. मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मिंधे सरकारचा निषेध केला. तर पुणे, नगर, सोलापूरसह राज्यभरात जालन्यातील घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ‘मिंधे सरकार चले जाव’ असा संताप सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा कराल तर… गद्दार आमदार गायकवाड यांची धमकी

बुलढाणा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार आहे. मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱया सरकारला बुलढाण्यात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलकांना गद्दार आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा कराल तर माझ्याकडेही टीम तयार आहे, असे ते म्हणाले.

एकही बस धावली नाही

मराठवाडय़ात शनिवारी ठिकठिकाणी उग्र आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मोठय़ा प्रमाणावर वाहनांची जाळपोळ केल्यामुळे सकाळपासूनच मराठवाडय़ाच्या आठही जिह्यांतील आगारातून बस वाहतूक दुपारपर्यंत बंदच ठेवण्यात आली. बीड, लातूर, जालन्याकडे जाणाऱया बसफेऱया रद्दच करण्यात आल्या.

हिंगोलीत मुनगंटीवारांना काळे झेंडे दाखवले

मिंधे सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे औंढा नागनाथ येथे आले होते. यावेळी मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांना अमानुष लाठीहल्ल्याचा जाब विचारला. त्यानंतर वसमत येथेही सुधीर मुनगंटीवार यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. सेनगाव येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी हिंगोली बंद पुकारण्यात आला आहे.

पोलिसांच्या उलटय़ा बोंबा… 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे

आंतरवाली सराटीत शांततेत सुरू असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडणाऱया पोलिसांनी उलटय़ा बोंबा ठोकत मराठा कार्यकर्त्यांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. मनोज जरांगे यांना प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात घेऊन जात असताना आंदोलकांनी हुज्जत घालून दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले, अशी तक्रार पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरूळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, किशोर कटारे यांच्यासह 350 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘इंडिया’ची बैठक असतानाच लाठीहल्ला होतोच कसा?

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू असतानाच जालना जिह्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला होतोच कसा, हा निव्वळ योगायोग कसा समजायचा? प्रसारमाध्यमांसह सर्वांचेच लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीहल्ला झाला का, असा सवाल श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केला.

गृहमंत्री जबाबदारी घेणार आहेत का?

गोवारी आंदोलनाच्या वेळी नैतिक जबाबदारी स्वीकारून तेव्हाचे आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आंतरवाली येथील लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी आता गृहखात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते स्वीकारणार आहेत का, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले मराठा आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून चिरडल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्याशीही पवार यांनी चर्चा केली. अंबड येथे जाऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लाठीहल्ल्यातील जखमींची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा पवारांनी कडक शब्दांत निषेध केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते; परंतु पोलिसांनी मध्येच अतिरेकी बळाचा वापर केला, असे जखमींनी सांगितल्याचे पवार म्हणाले. पोलिसांनी लाठीहल्ला करताना लहान मुले पाहिली नाहीत… वृद्ध पाहिले नाहीत… महिला पाहिल्या नाहीत… मनाला वाटेल तसा बळाचा वापर करण्यात आला, असे पवार म्हणाले.

काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवारी हत्याकांडाच्या वेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यावेळी राजीनामा दिला नव्हता, अशी टीका केली होती. त्याचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. गोवारी प्रकरण घडले त्यावेळी मी मुंबईत होतो, परंतु गोवारी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे आदिवासी कल्याणमंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आता ज्यांच्यावर गृहखात्याची जबाबदारी आहे ते नैतिकता दाखवणार का, असा फडणवीसांचा नामोल्लेख न करता पवारांनी टोला मारला. त्यावेळी सरकारने कसे काम केले याचा वस्तुपाठ घेतला तर बरे होईल, असेही पवार म्हणाले.

रास्ता रोकोमुळे पवार दुसऱया मार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे
समर्थ सहकारी कारखान्यासमोरील उड्डाणपुलाखाली लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ प्रचंड रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी टायरही जाळले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. याचा फटका आंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या शरद पवार यांनाही बसला. दोन्ही बाजूने रस्ता जाम असल्यामुळे त्यांना पैठणमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जावे लागले.

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द पाळला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. सरकारने शब्द न पाळल्यानेच हे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलन संयमी होते, पण एका बाजूने चर्चा करण्यात आली आणि दुसऱया बाजूने लाठीहल्ला करण्यात आला. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु आंदोलकांनी आपल्या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवावे, असेही शरद पवार म्हणाले. आंदोलन करत असताना कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

कुठून तरी फोन आला…
प्रशासनाशी आमची शांततेत चर्चा सुरू होती. या चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा होती. चर्चा सुरू असतानाच अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा आला आणि कुठून तरी फोन आला आणि पोलिसांचा उपोषणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. कोणताही सारासार विचार न करता पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचे जखमींनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले.

लाठीहल्ला करणाऱयांना निलंबित करा – उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले यांनीही आंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अमानुष लाठीहल्ला करणाऱया पोलीस अधिकाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. अन्य समाजांना न्याय मिळतो, मराठा समाजाला का न्याय मिळत नाही असा सवालही त्यांनी केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.