गुरुवर्य, तुम्ही सुद्धा! जळगावात शिक्षक मतदारांना जोड आहेर अन् सोबत पेशवाई नथही!

नाशिक मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा लाजिरवाणा प्रकार उघड झाला असतानाच आता शिक्षक मतदारांना चक्क जोड आहेर करण्यात येत असून, त्यासोबत पेशवाई नथही देण्यात येत आहे. लोकशाहीच्या या वस्त्रहरणात शिक्षकही सामील होत असल्याचे पाहून ‘गुरुवर्य, तुम्ही सुद्धा’ अशी प्रतिक्रिया खान्देशात उमटली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होत आहे. प्रचारासाठी आता अवघे 48 तास उरले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ‘करेक्ट’ कार्यक्रम करून निवडणूक आयोगालाही गंडवणारे मुख्यमंत्री मिंधे हे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नुकतेच खान्देशात येऊन गेले. मुख्यमंत्र्यांची सभा शिक्षकांना मालामाल करून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता शिक्षक मतदारांची घरे, शाळा शोधून पैठणी साडी, ड्रेस आणि सोबत पेशवाई नथ घरपोच नेऊन देण्यात येत आहे. आहेराचे हे पाकीट निनावी असले तरी काही स्वाभिमानी शिक्षकांनी हे ‘मिंधे’पण नाकारल्याचे वृत्त आहे.

शिक्षक मतदारसंघ हा विद्वत्तेसाठी ओळखला जातो. अनेक नामवंत, विचारवंतांनी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका कधी जाहीर होत आणि कधी मतदान होत असे हे सर्वसामान्यांना कळतही नसे. पण नाशिक मतदारसंघात या निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवण्यात येत आहेत आणि शिक्षक मतदारांनीही स्वत:ला या बाजारात उभे केल्याने सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.

पैसे वाटपाची तहसीलदारांकडून चौकशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या पैसे वाटपाचा व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हायरल केला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार तसेच प्रांताधिकार्‍यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का याचीही चौकशी करण्यात येणार आहे.