‘घुंगुरकाठी’च्या कट्ट्यावर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर

जयवंत दळवींच्या आठवणी, चित्रफिती, अभिवाचन, साहित्यावर चर्चा अशा उपक्रमांनी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील ‘घुंगुरकाठी’ संस्थेने ‘दळवी कट्ट्या’वर जयवंत दळवींच्या आठवणींचा जागर केला. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात या वर्षी 14 ऑगस्टला झाली. यानिमित्ताने काही तरी कार्यक्रम करावा, अशी कल्पना सुचल्यानंतर ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी ‘दळवी कट्ट्या’च्या रूपाने प्रत्यक्षात आणली.

दळवींचे पुतणे पुरुषोत्तम ऊर्फ सचिन दळवी यांनी जयाकाकांच्या आठवणी सांगून रसिकांना खिळवून टाकले. याबरोबरच दळवींच्या अनेक पुस्तकांतील प्रकरणांचे अभिवाचन, दळवींबद्दल पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या भाषणांच्या चित्रफिती, दळवींच्या साहित्यावर आणि एकंदर साहित्य व्यवहारावर मुक्त चर्चा असे कार्यक्रमाचे अनौपचारिक स्वरूप होते.

सतीश लळीत यांनी ‘अलाणे फलाणे’मधील एक प्रकरण सादर केले. डॉ. सई लळीत यांनी ‘सारे प्रवासी घडीचे’मधील शांतू न्हावी सादर केला. पी. एल. कदम यांनी दळवींनी नाट्य चळवळीबद्दल एका लेखात मांडलेले विचार वाचून दाखवले. अॅड. देवदत्त परुळेकर, मंगल परुळेकर, प्रा. विजय फातर्पेकर, पद्मा फातर्पेकर, अॅड. नकुल पार्सेकर, लेखिका वृंदा कांबळी, पुरुषोत्तम कदम, विनय सौदागर, अभिनेते श्याम नाडकर्णी, नीतिन वाळके, आडाळीचे सरपंच पराग गावकर, पित्रे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी येथे आयोजित केलेल्या दळवी कट्टा कार्यक्रमात दळवींच्या स्नुषा उर्मी दळवी यांचा सत्कार डॉ. सई लळीत यांनी केला. यावेळी सतीश लळीत व जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी उपस्थित होते.