आम्हाला हा देश सोडून जायचा आहे! जयपूर एक्सप्रेस बळीच्या कुटुंबानी व्यक्त केली भीती

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलै रोजी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने अवघा देश हादरला. चेतन सिंह नावाच्या आरपीएफ जवानाने चार जणांची गोळी झाडून हत्या केली. आता यातील एका बळीच्या कुटुंबाने देश सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या देशात आता पूर्वीसारखं सुरक्षित वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

या दुर्घटनेतील बळी ठरलेल्या कादर भानपूरवाला यांचा मुलगा हुसैन भानपूरवाला याने ही इच्छा व्यक्त केली असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. तसंच, राज्य सरकारच्या तपासाच्या वेगावरही हुसैन याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. चेतन सिंह याचा वाद त्याच्या वरिष्ठाशी झाला होता. मग त्याने आपल्या वडिलांना आणि अन्य प्रवाश्यांना का ठार मारलं? मी बोरीवली येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना चार वेळा भेटलो. पण, त्यांच्यापैकी कुणीही मला तपासाविषयी नीट माहिती दिली नाही. त्यामुळे आता घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य प्रवाशांचा माग काढून त्यांच्याकडून माहिती मिळवणार असल्याचंही हुसैन यांचं म्हणणं आहे.

हुसैन आणि त्याचा भाऊ दुबईत नोकरी करतात. त्यांचे आई-वडील इथेच राहतात. काही वर्षांनी दुबईतील आपली नोकरी सोडून आई वडिलांकडे येऊन राहण्याचा त्यांचा विचार होता. इथे मयत कादर यांचा लहान मुलांसाठी लागणाऱ्या उत्पादनांचा व्यवसाय सांभाळावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र, चेतन सिंह याच्या गोळीबारात कादर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता त्यांनी आपल्या आईला दुबईला न्यायचा निर्णय घेतला असून पुन्हा देशात परत येणार नसल्याचं म्हटलं आहे. हा देश आता तितका सुरक्षित राहिलेला नाही, असंही हुसैनने म्हटलं आहे.

31 जुलै रोजी मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्रपेसमध्ये ही घटना घडली होती. गाडीत तैनात असलेल्या चेतन सिंह या आरपीएफ जवानाने गाडीच्या बी- 5 डब्यात अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या जवानाचे वरिष्ठ असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक टीकाराम मीना व अन्य तीन प्रवासी अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटांत चेतन याने तब्बल 12 गोळय़ा झाडल्या. त्यामुळे डब्यात रक्ताचा सडा पडला होता.